राष्ट्रवादी-भाजपा नेत्यांच्या सुरु झाल्या गळाभेटी
राज्यात नव्या समिकरणाच्या नांदीची चर्चा
मुंबई । वार्ताहर
मुकेश अंबानी यांच्या अॅन्टोलीया या निवास्थानासमोर स्फोटके सापडलेल्या स्कॉर्पीयो प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे हे चांगलेच अडकले असून त्यांना वाचवण्याच्या नादात शिवसेनेचाच राजकीय जीव जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहेे. सचिन वाझेचे ओझे शिवसेनेने डोक्यावर घेतल्यामुळे एकाकी पडली असून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर राज्यात राजकीय चर्चेला उधान आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची या पार्श्वभूमीवर भेट गेतल्याने आणखीनच वातावरण ढवळून निघाले आहे. दिल्लीत शरद पवार यांनी काही भाजपा नेत्यांची चर्चा केल्याने नव्या समिकरणाच्या नांदीची चर्चा रंगू लागली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. यावेळी रोहित यांनी दरेकरांना भला मोठा गुच्छ दिला. रोहित पवार आणि दरेकर यांनी या भेटीचं कोणतंही ठोस कारण दिलं नाही. दरेकरांनी ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं आहे. वाझे प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. त्यामुळे शिवसेनेची मोठी अडचण झालेली आहे. असं असताना कोणत्याही कारणाशिवाय केवळ पवारांनी दरेकरांची सदिच्छा भेट घेतल्याने त्याचे अनेक राजकीय अर्थ निघत आहेत. ही सदिच्छा भेट दहा मिनिटांची होती. रोहित पवार पक्षाचा काही निरोप घेऊन दरेकरांकडे आले होते का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. अचानक झालेल्या या भेटीचे भेट देणार्याने आणि भेट घेणार्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने (की टाळल्याने) या भेटीवर तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच ही भेट म्हणजे शिवसेनेसाठी संकेत असल्याचंही बोललं जात आहे.
वाझे प्रकरणात शिवसेनेला विरोधकांनी घेरलं आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असल्या तरी विरोधक शांत झालेले नाहीत. विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नसताना संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. मग अनिल देशमुख हे खातं सांभाळण्यात अपयशी ठरल्याने त्यांचाही राजीनामा का घेऊ नये, असं खुद्द शिवसेनेतूनच बोललं जात आहे. देशमुखांचा राजीनामा घेतल्यास वाझे प्रकरण थंड होईल, असं शिवसेना नेत्यांचं म्हणणं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. देशमुखांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीवर शिवसेनेकडून दबाव वाढत चालल्यानेच रोहित पवार यांनी दरेकरांची भेट घेऊन शिवसेनेला राजकीय मेसेज दिला असावा, असं राजकीय जाणकार सांगत आहेत.
अँटालिया प्रकरणी चौकशी सुरू असताना योग्य पद्धतीने तपास झाला नाही. त्याची माहिती मीडियाला योग्यरित्या दिली गेली नाही. तसेच गृहमंत्र्यांकडूनही समाधानकारक माहिती दिली गेली नाही. अनेकवेळा तर गृहमंत्र्यांऐवजी विरोधी पक्षनेत्याकडेच सर्वाधिक माहिती होती. त्यामुळे शिवसेनेकडून गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे गृहमंत्री आहेत. त्यांच्या अंतर्गत पोलीस खातं येतं. अशा वेळी गृहमंत्री देशमुख काय करत होते. त्यांची काहीच जबाबदारी नाही का? असा सवालही शिवसेनेच्या गोटातून केला जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकारणाचे अनेक अर्थ काढले जातात. पवारांचा अर्थ सत्ता के साथ भी, सत्ता के बाद भी असाही राजकारणात घेतला जातो. म्हणजे शरद पवार एक तर प्रत्यक्ष सत्तेत असतात किंवा सत्तेत नसतील तर सत्तेच्या जवळच असतात. 2014मध्ये मोदींची लाट असताना त्यांनी महाराष्ट्रात लगेचच भाजपला पाठिंबा दिला होता. मोदींच्या बाजूने लोकमत असल्याचं कारण देत त्यांनी पाठिंबा दिला होता. भाजपसोबत बार्गेनिंग करण्याची शिवसेनेची पॉवरच पवारांनी काढून घेतली होती. त्यानंतर आता संधी मिळताच त्यांनी शिवसेनेसोबत सत्ताही स्थापन केली.
Leave a comment