कोरोना संसर्ग वाढू लागल्याने जिल्ह्यातील सर्व
आठवडी बाजार, कोचिंग क्लासेस, यात्रा 31 मार्चपर्यंत बंद
बीड । वार्ताहर
गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. ही स्थिती लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने आता सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी कोरोनाचे निर्बंध आणखी वाढवण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी येत्या 31 मार्च 2021 पर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, तसेच कोचिंग क्लासेस (दहावी-बारावी वगळून) बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबरोबरच जिल्ह्यातील सर्व यात्रा, मोर्चे ,आंदोलने, उपोषण यांना देखील बंदी घालण्यात आली आहे .
जिल्ह्यातील कोरोनाविषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी शुक्रवारी नव्याने आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आजपासून येत्या 31 मार्च पर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, कोचिंग क्लासेस (दहावी बारावी वगळून ) बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व यात्रा, मोर्चे, आंदोलने, उपोषण यांना देखील बंदी घालण्यात आली आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा वापर करून भाजीपाला व फळ विक्रीला परवानगी देण्यात आली आहे.
पाच पेक्षा जास्त बाधित रुग्ण
सापडल्यास परिसर कन्टेनमेंट झोन!
जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संसर्ग रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर कन्टेनमेंट झोन तात्काळ जाहीर करण्यासाठी ज्या ठिकाणच्या 100 मीटर परिसरात 5 किंवा 5 पेक्षा जास्त कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून येतील असा परिसर तात्काळ कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात यावे असे निर्देश शुक्रवारी (दि.5) जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी निर्देश जारी केले आहेत.
यंत्रणेला दिले निर्देश
शहरी भागातील स्थाननिश्चिती कंटेटमेन्ट झोनबाबत कार्यवाही मुख्याधिकारी नगर परिषद यांनी करावी. तालुका आरोग्य अधिकारी यांना तात्काळ कळवावे यासाठी स्थानिक पोलीस निरीक्षक यांची मदत प्रत्येकवेळी घ्यावी.ग्रामीण भागातील स्थान निश्चिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी कंटेटमेन्ट झोनबाबत कार्यवाही करावी. कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी यांनी तहसिलदार यांना विनाविलंब द्यावी.यानुसार तहसिलदार यांनी आदेश व कालावधी संपल्यानंतर नियमाप्रमाणे शिथिल आदेश नियमित देण्यात यावे असे निर्देशही जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.
Leave a comment