आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

 अंबाजोगाई । वार्ताहर

शहरातील मोरेवाडी परिसरात सोमवारी (दि.01) सायंकाळी गणेश सुंदरराव मोरे (वय 21) या तरुणाचा भर रस्त्यात निर्घुण खून करण्यात आला होता.या प्रकरणी तीन अल्पवयीन आरोपींसह पाच जणांवर कट रचून खून केल्याचा गुन्हा रात्री उशिरा अंबाजोगाई शहर ठाण्यात नोंदविण्यात आला.त्यातील फरार झालेल्या दोन आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात मंगळवारी दिवसभर ठिय्या दिला.अखेर मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अतिशय तणावपूर्ण वातावरणात गणेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  
या प्रकरणी सुंदरराव महादेव मोरे यांच्या फिर्यादीनुसार,सात महिन्यांपूर्वी प्रतिक प्रदीप तरकसे याने गणेश मोरे,पवन मोरे आणि इतरांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार अंबाजोगाई शहर ठाण्यात दिली होती.त्यात ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन अटक झाल्यानंतर काही दिवसांनी गणेश आणि इतरांची जामिनावर मुक्तता झाली होती.त्यानंतर प्रदीप तरकसे,अमोल लक्ष्मण पौळे आणि दोन अल्पवयीन आरोपी हे अधूनमधून त्यांच्याकडे आणि गणेशकडे येत असत.दोन लाख रूपये दे,आम्ही केस मिटवून घेतो,तुझे आणि तुझ्या मुलाचे नांव काढून घेतोत अशी मागणी ते करत.अन्यथा तुला,तुझ्या मुलाला जीवे मारून टाकू अशी धमकी ही त्यांनी दिली होती.सुंदरराव मोरे यांनी त्यांना नकार देत न्यायालय जो काही निर्णय देईल तो मान्य करणार असल्याचे सांगितले होते.तरी देखील ते पैशांची मागणी करून धमकावत होते.या कारणावरून सोमवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास प्रदीप तरकसे,अमोल पौळे आणि एका अल्पवयीन आरोपीच्या सांगण्यावरून मोरेवाडीतील जयभीम नगर आणि उज्ज्वल विद्युत नगर मधील दोन अल्पवयीन आरोपींनी गणेश मोरे यास तलवार,विटा आणि दगडांनी मारहाण करून त्याचा खून केल्याचे सुंदरराव मोरे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.सदर फिर्यादीवरून प्रदीप तरकसे,अमोल पौळे आणि तीन अल्पवयीन आरोपींवर कट रचून खून केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.पुढील तपास पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार करत आहेत. 

दोन आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर 

खून केल्यानंतर ते दोन अल्पवयीन आरोपी स्वतः चालत येऊन अंबाजोगाई शहर ठाण्यात हजर झाले.तर,तिसर्‍या अल्पवयीन आरोपीस पोलिसांनी जयभीम नगर येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. 

आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांचा ठिय्या 

उर्वरित दोन सज्ञान आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी करत मयत गणेश मोरेच्या संतप्त नातेवाईकांसह शेकडो मोरेवाडी ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत शहर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला.यावेळी गणेशच्या मारेक-यांना आपल्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी करीत त्याची आई संगीता,वडील सुंदरराव,आजोबा महादेव आणि आजी सत्वशीला यांनी हंबरडा फोडला.दरम्यान,मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी अमोल पौळे या आरोपीस ताब्यात घेतले असल्याचे समजते. 

तीन तासांच्या आत तीन आरोपी ताब्यात 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर सकाळपासूनच शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडून होत्या. संतप्त जमावाला शांत राहण्याचे व तपासात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.घटना घडल्यानंतर तीन तासांच्या आत तीन आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे आश्वासन देत मयत गणेश यांचे पार्थिव ताब्यात घेवून अंत्यसंस्कार करण्याचे आवाहन केले. 

तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार 

दरम्यान,स्वाती भोर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जमावाने मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली.दुपारी शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता गणेशच्या पार्थिवावर तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.घटना घडलेला मोरेवाडी परिसरही मंगळवारी कडकडीत बंद होता.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.