4 मार्चला होणार सुनावणी
बीड । वार्ताहर
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आदर्श उपविधीतील नियमानुसार संस्था मतदारसंघताले तब्बल 87 उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर आता 48 उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या निर्णयाविरोधात सहनिबंधक लातूर यांच्याकडे अपील केली असून या प्रकरणाची सुनावणी 4 मार्चला होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागून असताना तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपविधीतील पोटनियम 34 ए (5) मधल्या अटीला अंतरीम स्थगिती दिली होती. त्या प्रकरणाची अंतिम सुनावणी 2 तारखेला सहकार मंत्र्यांच्या न्याय कक्षेत होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 19 जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत 214 अर्ज दाखल झाले होते. मात्र, सेवा सोसायटीच्या 11 मतदार संघातून दाखल झालेले सर्वच 87 उमेदवारी अर्ज नामंजूर झाले आहेत. यातील 48 उमेदवारांनी लातूर येथील विभागीय सहनिबंधकांकडे अपिल दाखल करत निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या निर्णयास आव्हान दिले आहे.त्यांच्या अर्जांवर 4 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. सेवा सोसायट्यांना लेखा परीक्षणात अ किंवा ब दर्जा नसल्याने राष्ट्रवादी, भाजपसह इतर पक्षांतील मातब्बरांचे अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे निवडणुकीत मोठा पेच निर्माण झाला आहे. उमेदवारांचा ठराव देणार्या सेवा सोसायटीला लेखा परीक्षणात सलग तीन वर्षे अ किंवा ब दर्जा असावा या बँकेच्या उपविधीला स्थगितीसाठी सहा वर्षांपूर्वी तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंतरिम स्थगिती दिली होती. आता यावरही स्थगितीबाबत निर्णय दोन मार्च रोजी होणार आहे. दरम्यान सेवा सोसायटी मतदारसंघातील 11 जागांचा निर्णय सहकार मंत्री वउपनिबंधकांच्या कोर्टात आहे.मात्र, उर्वरित सात मतदार संघांतील आठ जागांसाठी सध्या 58 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. 10 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज घेण्याची शेवट तारीख आहे.त्यानंतर 20 मार्चला मतदान आणि 21 मार्चला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
Leave a comment