प्रशासनाकडून कोल्हेरसह येवले वस्ती कंटेटमेंट झोन जाहीर
गेवराई । वार्ताहर
तालुक्यातील येवले वस्ती, कोल्हेर या गावातील येवले वस्तीवर असलेल्या महानुभाव आश्रमात शुक्रवारी (दि.26) एकाचवेळी 29 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तहसीलदार सचिन खाडे यांनी ही माहिती दिली. दरम्यान एकाचवेळी 29 व्यक्ती बाधित निष्पन्न झाल्याने इतर गावात विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी संपूर्ण येवले वस्ती, कोल्हेर येथे पुृढील अनिश्चित कालावधीसाठी कंटेटमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील कोल्हेर गावातील येवले वस्तीवर महानुभाव आश्रम आहे. या ठिकाणी गुरुवारी (दि.25) सोहळा होता. या सोहळयाला अनेकांनी हजेरी लावली होती. शुक्रवारी येथील सुमारे 60 व्यक्तींची कोरोनासाठी अँटिजन चाचणी करण्यात आली. यात तब्ब्ल 29 व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत. एकाच आश्रमातील इतक्या मोठ्या प्रमाणावर व्यक्ती कोरोना बाधित आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान तहसीलदार सचिन खाडे आणि तालुका आरोग्य अधिकार्यांनी सदर आश्रमास भेट दिली. कोरोना बाधितांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.या आश्रमात गुरुवारी झालेल्या सोहळ्यास जिल्ह्यातील अनेकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी हजेरी लावली त्यांना जर काही कोरोनसदृश्य लक्षणे असतील तर त्यांनी स्वतःहून समोर येऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे.
Leave a comment