शाळा बंद, खासगी क्लासेस सुरु
विद्यार्थ्यांना शाळेत कोरोना होतो क्लासेसमध्ये नाही काय?
बीड । वार्ताहर
सर्व काही अलबेल असले की आणि ताळमेळ नसलेले निर्णय झाले की सर्वांनाच महंमद तुघलक याच्या कारभाराची आठवण आल्याशिवाय राहत नाही. बीडसह राज्यात असाच काही प्रकार सुरु आहे. कोरोना संसर्गाची लाट नव्याने येणार या भितीने आणि तपासणीनंतर कोरोनाच्या रुग्णामध्ये वाढ होवू लागल्याने मुंबई-पुण्यातील शाळा अगोदर बंद करण्यात आल्या आणि त्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यातीलही शाळा 10 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय त्या -त्या जिल्हा प्रशासनाने घेतला. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र जगताप यांनी देखील गुरुवारी 10 मार्च पर्यंत शाळा बंद करण्याचा आदेश पारित केला. एकीकडे शाळा बंद आहेत दुसरीकडे मात्र खासगी क्लासेस तुडूंब भरुन चालू आहेत विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगल कार्यालय, खासगी शिकवणीवर्ग, हॉटेल या ठिकाणी तपासणी करुन कार्यवाही करण्याचे सुतोवाच केले होते. मराठवाड्यातील जिल्हाधिकार्यांच्या बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी देखील मंगल कार्यालय, क्लासेस यांच्यावर धाडी घाला, एकवेळ समजून सांगा दुसर्या वेळेस दंड करा आणि पुन्हा सापडला तर गुन्हा दाखल करा असे सांगतानाच बीडबद्दल चिंता व्यक्त केली होती. या एकंदरीत सगळ्या गोेंधळामुळे बीडकरांना पुन्हा एकदा प्रशासनातील तुघलक कारभाराची प्रचिती आली आहे.
अचानक राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने उपाययोजना म्हणून काही प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहेत. मराठवाड्यातील आणि काही राज्यातील काही जिल्ह्यातील आठवडी बाजार मोठमोठी मंदिरे देखील बंद झालेली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वप्रथम पुण्यातील शाळा, महाविद्यालये बंद केली त्यानंतर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली. बीडमध्ये देखील शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत मात्र मराठवाड्यात क्लासेसचे माहेरघर असलेले लातूर, नांदेड आणि त्या पाठोपाठ औरंगाबाद या तिन्ही शहरात बिनधास्तपणे पुर्ण संख्येने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत खासगी क्लासेस सुरु आहेत. बीडमध्ये देखील सर्वच क्लासेस जोरदार सुरु आहेत. क्लासेस बंद व्हावेत अशी कोणाचीही इच्छा नाही कारण त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान हेाते. पण जे विद्यार्थी क्लासेसमध्ये जावू शकत नाही, क्लासेसची भरमसाठ फिस भरु शकत नाहीत त्या विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? कारण सरकारने शाळा बंद केल्या आहेत. शाळेमधून विद्यार्थ्यांचा संपर्क येतो तसा क्लासेसमध्ये येत नाही का? याचा विचार प्रशासनाने करायला हवा होता.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तपासणी करण्याचे सुचना केल्यानंतर बीड किंवा इतर शहरात कुठेही मंगल कार्यालय, खासगी क्लासेस, हॉटेल या ठिकाणी जावून तपासणी केली नाहीत विभागीय आयुक्ताच्या सुचनेनंतर काही क्लासेसवर जावून महसुल विभागातील कर्मचार्यांनी संख्येची मर्यादा आणि कोरोनाचे नियम पाळण्याच्या सुचना केल्या मात्र किती क्लासेस चालकांनी या सुचना पाळल्या हे कोणी तपासले नाही. बीड शहरात सहयोग नगर भाग, शाहूनगर, आदर्श नगर, अंबिका चौक, माने कॉम्प्लेक्स परिसरात मोठ्या प्रमाणात क्लासेस आहेत त्या ठिकाणी आजही विद्यार्थ्यांची गर्दी प्रशासनातील अधिकार्यांनी पाहायला हवी. खरे तर एका बाकड्यावर एक विद्यार्थी या प्रमाणे शाळा सुरु ठेवायला हव्या होत्या अशीही पालकांची भावना आहे. कारण गेल्या मार्च पासून शाळाच झाल्या नाही गेल्या महिनाभरापासून कशातरी शाळा सुरु झाल्या आता पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांनी परिक्षेत लिहावयाचे तरी काय? असा प्रश्न पालकांनाच पडला आहे आतातरी प्रशासनाने एक तर शाळा सुरु कराव्यात नाहीतर क्लासेस बंद करावेत अशी अपेक्षा शहरातील पालकवर्गातून व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थीच नाहीतर शिक्षकांना बंधन का?
शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थीच नाहीत मात्र शिक्षकांना शाळेत येणे बंधनकारक केले आहे. खरेतर गेल्या वर्षभरापासून शाळा न भरताच शिक्षकांना भरमसाठ वेतन देण्यात आले आहे. खासगी शाळांमधून मात्र शिक्षकांना वेतन दिले गेले नाही मात्र विद्यार्थ्यांकडून पुर्णपणे फीस वसूल केली गेली. खासगी शाळा मग त्या इंग्रजी माध्यमाच्या असतील किंवा मराठी माध्यमाच्या असतील या दोन्ही शाळांमधील जि.प.च्या शाळांप्रमाणेच त्यांना आहे तरी तेवढा पगार द्यायला हवा होता. न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या फिस माफीबद्दल निर्णय घेतला नाही शिक्षकांच्या पगाराचे काय? असा सवालही केला जात आहे.
Leave a comment