आता 7 मतदारसंघाच्या 8 जागेसाठी
58 उमेदवारांमध्ये होणार लढत
बीड । वार्ताहर
बीड जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या 19 जागांसाठी 20 मार्च रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीतील सांशकता अजुनही कायम आहे. बुधवारी (दि.24) राखीव उमेदवारी अर्जांवरील सुनावणीचा निकाल निवडणूक निर्णय अधिकार्यांनी दिला. यात सुमारे दीडशेपेक्षा अधिक अर्ज बाद झाले असून आता सात मतदारसंघातील आठ जागांसाठी 58 उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. दरम्यान सेवा सोसायटीच्या 11 मतदारसंघातून दाखल झालेले सर्वच 87 उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि.23) नामंजूर झाले होते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या संचालकांच्या 19 जागांसाठी 160 उमेदवारांचे 214 अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी (दि.23) छाननीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास देशमुख ,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळकृष्ण परदेशी यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेच्या सभागृहात पार पडली. जिल्हा बँकेच्या 19 संचालकांच्या निवडीसाठी होणार्या निवडणुकीसाठी तब्बल 214 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र, सेवा सोसायटी मतदार संघातील सर्वच अर्ज मंगळवारीच नामंजूर झाले. यामध्ये अनेक मातब्बरांचे अर्जही सेवा सोसायट्यांना लेखा परीक्षणाचा अ किंवा ब दर्जा नसल्याने बाद झाले. त्यामुळे निवडणुकीत मोठा पेच आणि ट्विस्ट निर्माण झाले आहे. दरम्यान, आता उर्वरित सात मतदार संघांच्या आठ जागांसाठी 20 मार्चला मतदान आणि 21 मार्चला मतमोजणी होईल. 10 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज घेण्याची शेवट तारीख आहे.
Leave a comment