लसीकरणाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा
बीड | वार्ताहर
कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून नागरिकांना वारंवार नियमांचे पालन करण्याचे सांगितले जात आहे. याउलट आरोग्य यंत्रणेकडून या नियमांना हरताळ फासला जात असल्याचे बीडमध्ये दिसून आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. आरोग्य विभागासह महसूल आणि पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जात असताना रुग्णालय प्रशासनाच्या नियोजनाअभावी लस घेण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यामध्ये सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. आरोग्य यंत्रणेकडूनच नियमांचे पालन होत अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे राज्यभरात नव्याने निर्बंध लादले जात आहेत.अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने बीड जिल्ह्यातील नागरिकांनाही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन वारंवार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. असे असले तरी ज्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस आरोग्य महसूल आणि पोलिस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली जात आहे, त्याच ठिकाणी सामाजिक अंतर पाळले जात नसल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. लसीकरणासाठी आलेले कर्मचारी एका रांगेत उभे दिसून आले परंतु याठिकाणी त्यांनी सामाजिक आंतर राखावे अशा सूचनाही रुग्णालय प्रशासनाकडून कोणीही दिल्या नाहीत. शिवाय लस घेतल्यानंतर रुग्णालयात ज्याठिकाणी 'सेल्फी पॉइंट' उभारण्यात आला आहे, त्या ठिकाणीही कर्मचाऱ्यांची क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे कोरोना समूह संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
गर्दीमुळे अनेकांनी टाळली लस!
लसीकरणासाठी झालेली गर्दी पाहून अनेक कर्मचाऱ्यांनी आज लस घ्यायची नको गर्दी कमी झाल्यावर पाहू अशा भावना व्यक्त करतात लसीकरण टाळले. एकंदरच जिल्हा रुग्णालय प्रशासनाने लसीकरण ठिकाणी होणारी क्षमतेपेक्षा अधिकची गर्दी लक्षात घेऊन कोरोनाच्या नियमाचे पालन होईल असे नियोजन करून लसीकरण मोहीम वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा शहरातील सुजाण नागरिकांनी व्यक्त केली.
Leave a comment