आंब्यासह फळबागाही धोक्यात;शेतकरी हताश 

बीड । वार्ताहर

सोसाट्याचा वारा अन् जोरदार अवकाळी पावसाने बीड जिल्ह्यात रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या या अवेळी पावसाने काढणीला आलेली ज्वारी, गहू अन् हरभर्‍याचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगीतले. दरम्यान हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. त्यामुळे बळीराजा हताश झाला आहे.
मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. आंब्याचा मोहर गळून पडला आहे. डाळिंब, पपई, द्राक्षे या फळबागांचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला गहू भुईसपाट झाला आहे.  बीड शहर व तालुक्यात काही ठिकाणी मध्यरात्री झालेल्या पावसानंतर वीज पुरवठा काही वेळ खंडीत झाला होता. या दरम्यान धारूर तालुक्यात चिखली, सुकळी, दैठाणा, फकीरजवळा, जैतापूर, मुंगी, कुंडी, या भागामध्ये रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या भागात गुरूवारी रात्री गारपीटही झाली. बोरांच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला. अंबाजोगाई, केज, धारूर, परळी तालुक्यामध्ये रात्री दोन वाजल्यापासून रिमझिम पावसाला सुरूवात झाली. अंबाजोगाई तालुक्यात मध्यरात्री खंडीत झालेला वीज पुरवठा दुपारपर्यंत सुरू झाला नव्हता.
पाटोदा, आष्टी तालुक्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसला. पहाटेपर्यंत अवकाळी पाऊस सुरू होता. पाटोदा तालुक्यातील बेंनसुरा येथे गारव्याने वीस मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. शिरूर तालुक्यात पहाटे पावसाने हजेरी लावली, माजलगाव, वडवणी तालुक्यातही रब्बीसह आंब्याचे नुकसान झाले आहे.माजलगाव तालुक्यात शुक्रवारी पहाटे दोन वाजल्यापासून पावसाला सुरूवात झाली. वीज पुरवठा खंडीत झाला. तालुक्यातील नाकलगाव, दिंद्रुड परिसरात अवकाळी पावसाने आणि गारपीटीमुळे ज्वारी, हरभरा, गहू, टरबूज, पपई या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे.

मस्साजोग परिसरात शेतपीकांचे अतोनात नुकसान

संपुर्ण केज तालुक्यात व हनुमंत प्रिंप्री महसुल मंडळ मस्साजोग परिसरात गुरुवारी (दि.18) मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्याची रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले.यामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला आहे .
केज तालुक्यातील शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती कोलमडून गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. राज्य सरकारने केज तालुक्यातील शेतकर्‍यांना हेक्टरी वीस हजार रुपयांची मदत करून शेतकर्‍यांचे अश्रु पुसण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी केज तालुक्यातील शेतकर्‍यांनी केली आहे.
 

गारपिटीमुळे तोंडाशी आलेल्या रब्बी पिकाचे अतोनात नुकसान

दिंद्रुडनजिकच्या चिखली (ता.धारुर) शिवारात झालेल्या गारपिटीमुळे रबी पिकाचे अतोनात नुकसान झाले. या गारपिटीने शेतकर्‍यांच्या तोडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावला. चखली,सुकळी, देवठाणा, फकिर जवळा, जैतापूर, मुंगी,कुंडी आदी गावातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले.
बुधवारी सकाळपासून कडक ऊन होते. रात्री अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले व 9 वाजेच्या दरम्यान बोराच्या आकाराच्या गाराचा वर्षाव सुरू झाला. बुधवारी रात्री आलेल्या वादळी वार्‍यासह गारपीट मुळे चिखली येथील शेतकरी संजय शेंडगे यांचे दोन एकर टरबूज पिकांचे नुकसान झाले आहे. परिसरात अचानक झालेल्या गारपीट व वादळी पाऊसामुळे रब्बी हंगामातील गहू, कांदा,ज्वारी, हरबरा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.महसूल विभागाने शेतांचा तात्काळ पंचनामा करत मदत मिळवून देण्याची अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

नेकनूर परिसरात गहू,ज्वारी,हरभर्‍याचे नुकसान

मोहरलेल्या आंब्याला फटका

शेतात काढून पडलेल्या काढणीला आलेल्या हरभरा, गहू ,ज्वारी यासोबतच मोहरून कैर्‍या लागलेल्या आंब्यांना गुरुवारी रात्री सुरू झालेल्या अवकाळीचा मोठा फटका बसला अनेक ठिकाणी काढून पडलेली पिके भिजली तर उभे असणारे पिके जमिनीवर लोळल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला याच बरोबर मोठ्या प्रमाणात मोहरून लगडलेल्या आंब्याना मार बसल्याने लहान-लहान कैर्‍याचा खच पडला.
नेकनूरसह परिसरात गुरुवारी संध्याकाळी 1 वाजता सुरू झालेल्या  वार्‍याने पावसाला सुरुवात झाली.पिकांच्या काढणीला अनेक ठिकाणी सुरुवात झाल्याने अनेक ठिकाणी गहू, हरभरा ,ज्वारी ही पिके शेतात पसरून पडलेली होती अवकाळी च्या फटक्याने या पिकांचा मोठा खराबा होणार आहे कलर  बदलणे, मळण्यासाठी वेळ लागण्याबरोबरच या पिकांची उलथापालथ शेतकर्‍यांना करावी लागणार आहे .  उभी पिकें वार्याच्या वेगाने अनेक ठिकाणी  जमिनीवर लोळली  काढून पडलेली आणि काढणीला आलेली पिके कालच्या अवकाळीने  नुकसानीचे केंद्रस्थान ठरले याच बरोबर मोहरलेला आंब्यानाही मोठा फटका बसला मोहर गळण्याबरोबरच छोट्या छोट्या कैर्‍या जमिनीवर पडल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले रावण शिंदे यांच्या शेतातील गहु जमिनीवर लोळल्याने मोठे नुकसान झाले.यावर्षी रब्बीच्या पिकाबरोबरच आंबे मोठ्या प्रमाणात मोहरलेले होते. मात्र कालच्या अवकाळीने गहू,हरभरा, ज्वारी या पिकांना मोठा फटका बसला हातातोंडाशी आलेले पीक क्षणार्धात नुकसानीच्या केंद्रस्थानी आले. नुकसानीचा पुन्हा एकदा सामना शेतकर्‍यांना करावा लागणार आहे.

अवकाळी पावसामुळे पिकांना तडाखा

आडस परिसरात अवकाळीने रब्बी पीके जमिनदोस्त 

तालुक्यातील आडस सह परिसरात मध्यरात्रीच्या अवकाळी पावसामुळे शेतातील सर्व उभे पिके आडवे झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. 
आडस व परिसरात पूर्वी पाऊसकाळ कमी असल्याने शेतकर्‍यांना  हरभरा, गहू, ज्वारीचे पीक घेता येत नव्हते,तर ज्या शेतकर्‍यांनाकडे पाणीसाठा उपलब्ध होता असेच शेतकरी रब्बीचे पीक घेत होते.परंतु गतवर्षी चांगला पाऊसकाळ झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शेतकर्‍यानी आपल्या शेतामध्ये हरभरा,गहू ,ज्वारीचे पीक घेतले, आणि ते जोमात पिकलेले पीक काढण्यासाठी आले होते.तर काही शेतकर्‍यांनी हरभरा,गहू काढण्यास सुरुवात केली होती. परंतु मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडल्याने शेतकर्‍यांचे हरभरा,गहू यासह ज्वारीचे उभे पीक आडवे पडल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असल्याने,पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्या-पंकजा मुंडे

बीड जिल्हयात शुक्रवारी पहाटेपासून गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना मदत करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे.
जिल्हयात सर्वच ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, गारपिट आणि मोठया प्रमाणात अवकाळी पाऊस झाला, पावसाचा जोर आजही दिवसभरही सुरूच होता. अवकाळी पावसाने सर्वच तालुक्यांना झोडपून काढले. यामुळे बहरलेल्या आंब्याचा मोहर उध्वस्त झाला. डाळिंब, पपई, द्राक्षे या फळबागांचे त्याचप्रमाणे  ज्वारी, हरभरा, गहू या रब्बी पिकांचेही प्रचंड मोठे नुकसान झाले. काढणीला आलेले हे पीक अक्षरशः भूईसपाट झाले. शेतकर्‍यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने यामुळे हिरावून नेला आहे. अचानक आलेल्या या संकटाने शेतकरी पुर्णपणे कोलमडला आहे. सरकारने या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकर्‍यांना या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.