मुंबई | प्रतिनिधी
परळीच्या पूजा चव्हाण आत्महत्येनंतर एका मंत्र्याचं नाव या प्रकरणी समोर आलं, त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं, शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित संबंधामुळे पूजा चव्हाणने आत्महत्या केली असा आरोप भाजपाने केला होता, यात आरोपानंतर संजय राठोड यांचं मंत्रिपद अडचणीत सापडलं होतं, राठोड यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपाने केली होती.
अखेर या प्रकरणात संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे, वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, संजय राठोड यांचा राजीनाम्याबाबत सोमवारपासून विविध चर्चा सुरु होत्या. यात शिवसेनेत संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून दोन मतप्रवाह असल्याचंही दिसून आलं, मातोश्रीवर आज शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे, तत्पूर्वी संजय राठोड यांनी हा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वीकारला असल्याचं कळतंय, निष्पक्ष चौकशीसाठी हा राजीनामा स्वीकारला आहे, शिवसेनेत एक मोठा नेता आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या मागे खंबीरपणे उभं असल्याचं सांगण्यात येत होतं. धनंजय मुंडे प्रकरणात त्यांच्याकडून राजीनामा घेतला नाही तर मग संजय राठोड यांना तरी राजीनामा द्यायला का लावायचं? असा प्रश्न काही नेते उपस्थित करत आहेत शिवाय असं झालं तर वेगवेगळ्या मुद्यांवर विरोधक राजीनामे मागत सुटतील असा एक मतप्रवाह शिवसेनेत आहे.
तर पक्ष किंवा सरकार अडचणीत येत असेल तर राजीनामा घेऊन ठेवावा असाही एक मतप्रवाह शिवसेनेत पाहायला मिळत आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे. गेल्या काही दिवसांपासून राठोड अज्ञातवासात आहेत, त्यांनी या प्रकरणावर काहीही भाष्य केले नाही, मात्र बंजारा सामाजाने आणि पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांनी संजय राठोड यांना क्लिन चीट दिली आहे. मात्र या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सावध भूमिका घेतली आहे.
राठोड प्रकरणी उद्धव ठाकरेंची अग्निपरीक्षा
येत्या १ मार्चपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा धुरळा उडाला आहे. या घटनेचा आधार घेत महाविकास आघाडीच्या सरकारला कॉर्नर करण्याची संधी भाजप घेण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे. पूजा आत्महत्या प्रकरणात भाजपने वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेत शिवसेनेला कोंडीत पकडले आहे. या घटनेसह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे अध्यक्ष पदाच्या नव्या निवडीत दगाफटका होण्याची शक्यता लक्षात घेत सेनेने डिनर डिप्लोमसीचा आधार घेतला आहे. ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संजय राठोड प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सामोरे जावे लागणार आहे. भाजपकडून पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत आहेत. हे आरोप अर्थातच सेनेवर होत असल्याने सध्या शिवसेना महाविकास आघाडीत बॅकफुटला आली आहे. शिवसेनेवरील वाढता दबाव पाहता वनमंत्री संजय राठोड यांचा सेनेकडून राजीनामा घेतला जाण्याचे संकेत मिळत आहेत.
पूजा चव्हाण आत्महत्येच्या निमित्ताने संजय राठोड यांच्याविरोधात भाजपने अतिशय आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपच्या महिला आघाडीकडून तसेच भाजप नेत्यांनी संपूर्ण प्रकरणात अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. एक मार्चपासून मुंबईत सुरू होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राठोड प्रकरणात विरोधकांकडून मोठा गोंधळ घातला जाण्याची शक्यता आहे. यामुळेच शिवसेनेकडून या प्रकरणात लवकरच काहीतरी मोठा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. महाविकास आघाडीच्या सरकारवर यानिमित्ताने आरोप होत असल्याने शिवसेनेवरीलही दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे राठोडप्रकरणाची अडचण असताना दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आपला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने या पदासाठी होणार्या निवडणुकीत दगाफटका बसू नये, यासाठी तिन्ही पक्षांच्या आमदारांची एकत्रित बैठक बोलावली आहे.
याआधीच राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही एका महिलेने आरोप केले होते. पण भाजपचे आणि मनसेच्या नेत्यांनी या महिलेच्या आरोपात तथ्य नसल्याचे समोर येऊन सांगितल्यावर या प्रकरणात कलाटणी मिळाली होती. खुद्द तक्रारदार रेणू शर्मा या महिलेनेही आपले सगळ्या तक्रारी मागे घेतल्या होत्या. आता पूजा चव्हाण प्रकरणाच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांनीही ती आत्महत्या असल्याचे स्पष्ट केले आहे.
याआधीच शिवसेना भाजप युती काळातही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी युतीतल्या काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामध्ये सुरेशदादा जैन, महादेव शिवणकर, शोभाताई फडणवीस, नवाब मलिक यांच्यावर आरोप झाले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिका घेत जोवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तोवर मंत्रीपदाचा राजीनामा द्या, असे स्पष्ट केले होते. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये २०१२ मध्ये अजितदादा पवार यांच्यावर सिंचन घोटाळा प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनीही आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी एक श्वेतपत्रिका काढत सिंचन घोटाळा प्रकरणात अजितदादा यांना क्लीन चिट दिली होती.
महाविकास आघाडीची डिनर डिप्लोमसी
महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक मंगळवारी लावण्यात आली आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने ही बैठक महत्वाची मानली जात आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीसमोर पेचप्रसंग उभा राहिला आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लागणार का या विचारानेच महाविकास आघाडीच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळेच ही आमदारांची डिनर डिप्लोमसी महत्वाची मानली जात आहे.
मुख्यमंत्र्याचा कडक इशारा
काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे गंभीर आरोप केले होते, त्यानंतर आता शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे नाव तरूणीच्या आत्महत्येशी जोडलं गेलं आहे, त्यामुळे शिवसेनेची आणि सरकारची नामुष्की होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्याच पक्षाच्या संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन एकप्रकारे इतरांना कडक इशारा दिल्याचंही बोललं जातंय.
संजय राठोड मौन सोडणार?
पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अज्ञातवासात असलेले मंत्री संजय राठोड हे येत्या गुरुवारी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार असल्याचं कळतंय, वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी हे गाव आहे. या ठिकाणी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. गुरुवारी या मंदिरात येऊनच धर्मगुरूंच्या साक्षीने संजय राठोड आपली बाजू मांडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात आरोपांच्या केंद्रस्थानी असलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोडयांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अद्याप संजय राठोड यांनी याप्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पूजा चव्हाणने 7 फेब्रुवारीला पुण्यात आत्महत्या केली. त्यानंतर संजय राठोड यांच्या आवाजातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. यानंतर भाजपने थेट संजय राठोड यांचं नाव घेऊन, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीच, त्याशिवाय त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी आज राजीनामा पाठवल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. संजय राठोड हे 7 फेब्रुवारीपासून नॉट रिचेबल आहेत. गेल्या चार दिवसांपासून त्यांची गाडी मंत्रालयाच्या पार्किंगमध्ये उभी आहे. संजय राठोड यांचा कोणाशीच संपर्क नाही. माध्यमांनीही त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्कच होत नाही.
पोहरादेवीला शरण?
दरम्यान, नॉट रिचेबल असलेले संजय राठोड हे वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजेचे आराध्य दैवत असलेल्या पोहरादेवीला शरण जाण्याची शक्यता आहेत. कारण पोहरादेवी हे बंजारा समाजाची (Banjara) काशी समजली जाते. इथे येऊन संजय राठोड आपली भूमिका मांडण्याची चिन्हं आहेत. नुकतीच सेवालाल जयंती झाली. यावेळी बंजारा समाजाने संजय राठोड यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला.
पोहरादेवीचं महत्व काय?
वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेल्या संत सेवालाल महाराज, आई जगदंबामाता आणि राष्ट्रीय संत डॉ. रामराव महाराज यांच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येथे हजेरी लावलात.
पोहरादेवी येथे बंजारा समाजचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची समाधी आहे. नुकतंच ऑक्टोबर महिन्यात संत सेवालाल महाराजांचे वंशज आणि बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराज यांचं निधन झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते दिग्गजांनी रामराव महारांजांना श्रद्धांजली अर्पण केली होती.
डॉ. रामराव महाराज यांचे मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव वाशिमच्या मालेगाव येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मूळगावी पोहरादेवी येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी एकच गर्दी झाली. संत सेवालाल यांचे वंशज असल्याने रामरावबापू महाराज यांच्यावर बंजारा समाजाची अपार श्रध्दा होती. इतरही समाजात त्यांना मान होता.
रामराव महाराजांनी 1948 मध्ये पोहरादेवी येथील गादीवर बसल्यानंतर अन्नत्याग केला. त्यानंतर ते फक्त कडूनिंब, दूध आणि फळांचे सेवन करत होते. गेल्या काही महिन्यांपासून दूध घेतानाही त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे ते फक्त कडूनिंब आणि ज्यूस घेत होते. मात्र त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली.
Leave a comment