गडचिरोली येथे धुमश्चक्रीत तीन
नक्षलवाद्यांना घातले होते कंठस्नान
बीड । वार्ताहर
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा यांना सोमवारी (दि.25) राष्ट्रपती पदक जाहीर झाले.गडचिरोली येथे अपर अधीक्षक म्हणून कार्यरत असताना नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर तिघांना कंठस्नान घालण्याचे शौर्य त्यांनी केले होते. याची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पदक घोषित झाले आहे.
पोलीस दलात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता शौर्य गाजवणार्या अधिकारी-कर्मचार्यांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध पदकांनी गौरविण्यात येते. राष्ट्रपती पदक हे सर्वांत महत्त्वाचे मानले जाते. या पदकासाठी पोलीस अधीक्षक आर. राजा यांची निवड झाल्याने जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आर. राजा यांना यापूर्वी 2019 मध्ये उस्मानाबाद येथे कार्यरत असताना पोलीस महासंचालक पदकही मिळाले होते. दरम्यान, 2018 मध्ये ते गडचिरोली येथे अपर अधीक्षक म्हणून कार्यरत होते. तेथील सिरोंचा येथे नक्षलवाद्यांनी अवैध शस्त्राच्या जोरावर लोकप्रतिनिधी, सरकारी नोकरांना धमकावत उठाव खाल्ला होता. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी सकाळी सात वाजता आर.राजा यांच्या नेतृत्वाखाली 15 कर्मचार्यांची दोन पथके गेली होती. यावेळी नक्षलवाद्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. पोलिसांनी नक्षलवाद्यांना चोहोबाजूने घेरुन आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले;परंतु त्यास नक्षलवाद्यांनी दाद दिली नाही. उलट पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यात तीन पोलीस जखमी झाले होते. दरम्यान, नक्षलवाद्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी आर.राजा व सहकार्यांनीही गोळीबार केला. यामध्ये तीन नक्षलवादी पोलिसांच्या गोळीचा निशाणा ठरले होते. या शौर्याबद्दल आर. राजा यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
Leave a comment