प्रशासनाचे कुणीही प्रतिनिधी आंदोलनाकडे
फिरकले नसल्याने महिला संतापल्या
पालकमंत्र्यांची गाडी अडवण्याचा इशाराही दिला
बीड । वार्ताहर
गेल्या ६ दिवसांपासून आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते इमामपूर रोड, बार्शी नाक्याच्या १ वर्षांपासून रखडलेल्या कामाला सुरु करावे या मागणीसाठी रखडलेल्या रस्त्याच्या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत. या आंदोलनाकडे मुख्याधिकारी व नगरपरिषदेचे कुणीही फिरकले नसल्याने महिलांनी आज संतापून थेट नगरपरिषदेत जात मुख्याधिकाऱयांना बांगड्यांचा आहेर दिला आहे.
मुख्याधिकाऱयांनी हा आहेर बांगड्यांचा आहे लक्षात येताच तो स्वीकारला नाही मात्र संतप्त महिल्यांनी त्यांच्या खिडकीत ठेवत तात्काळ दखल घ्यावी अन्यथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांची गाडी दि २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनी अडवणार असल्याचा इशारा या महिलांनी दिलेला आहे.
आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, शहराध्यक्ष सय्यद सादिक व येथील स्थानिक नागरिक गेल्या ६ दिवसांपासून जाणीवपूर्वक रखडवलेल्या रस्त्याच्या कामाला सुरु करा म्हणून आंदोलनाला बसलेले आहेत.
या जाणीवपूर्वक रखडवलेल्या रस्त्यामुळे या भागातील नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत याचे कुणालाही देणेघेणे राहिलेले नसल्याने येथील आम आदमी ठिय्या आंदोलन करत असून प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या दुर्लक्षामुळे आज मुख्याधिकार्यांना बांगड्याचा आहेर संतप्त महिलांकडून देण्यात आला.
Leave a comment