गेवराईत तहसीलदारांसह महसूल पथकाची मोठी कारवाई
गेवराई । वार्ताहर
तालुक्यातील गोदा पट्ट्यातील वाळूचे उत्खनन व अवैध वाहतूक करणार्या माफियाविरूद्ध अखेर पोलीस व महसूल पथकाने धडक कारवाई करण्यास सुरूवात केली. दोन दिवसात वाळूने भरलेली नऊ वाहने ताब्यात घेतल्याने वाळू चोरांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, रविवारी उशिरापर्यंत गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष बाब म्हणजे, चार दिवसापूर्वीच आमदार पवार यांनी तहसील कार्यालया समोर उपोषण केले होते. शनिवार ता. 23 रोजी तहसीलदार सचिन खाडे यांच्या पथकाने तालुक्यातील गंगावडी येथून दोन हायवा, एक रोटर आणि वाळूने भरलेले एक ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
रविवार ता. 24 रोजी दुपारी दोन वाजता एसपी पथकाचे एपीआय हजारे व तहसीलदार सचिन खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी व रविवारी, असे सलग दोन दिवस वाळू चोरी करणार्या विरूद्ध धडक कारवाई केली आहे. दरम्यान, तालुक्यातील गोदापात्र व सिंदफना नदी पट्ट्यात रात्री-अपरात्री हायवा व ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत असून संबंधित वाळू तस्कर महसूल व पोलिस प्रशासनातील कर्मचार्यांना भित नाहीत. त्यांनाच दमदाटी करून, मारहाण करतात. त्यामुळे या पट्टयात वाळू चोरांची दादागिरी वाढली होती. त्यातच, दि.4 जानेवारी 2021 रोजी राक्षसभुवन रोडवरील गंगावाडी येथील रुस्तुम मत्ते यांना वाळू वाहतूक करणार्या हायवाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून या दुर्दैवी घटनेने गोदा पट्ट्यातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला होता.
गोदा पट्ट्यातील होणारा अवैध वाळू उपसा कायमचा बंद करण्यात यावा,वाळू तस्करी करणार्या वर कठोर निर्बंध घालावेत, वाळू लिलावाचे टेंडर तातडीने करून किचकट टेंडर प्रक्रिया सुलभ करून त्याचे दर कमी करण्यात यावेत,असे केल्याने अवैध वाळू तस्करी व चोरीवर नियंत्रण ठेऊन वाहने रात्री-अपरात्री भरधाव वेगाने धावणार नाहीत इतक्या वर्षात गोदाकाठच्या वाळूचे लिलाव झालेले नाहीत. सहा वर्षात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. वाळू लिलावाचे अपसेट प्राईस जास्तीचे असल्यामुळे लिलाव टेंडर घेण्यास संबंधित गुत्तेदार धजावत नाहीत. ही अपसेट प्राईज कमी करावी, जिल्हाधिकारी स्तरावर महसूल व पोलीस कर्मचारी व अधिकार्यांच्या स्पेशल टास्क फोर्स निर्माण करावा व त्यामध्ये माजी सैनिकांना सामावून घ्यावे, टास्क फोर्सने संयुक्त कारवाई करून वाळू तस्करी व साठा करणार्या वर धाडी टाकाव्यात, अशी महत्त्वपूर्ण मागणी करून, आमदार पवार यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते. त्यानंतर, तहसील व पोलिस प्रशासनाने शनिवार व रविवारी धडक कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.
Leave a comment