बीड । वार्ताहर
एसटी महामंडळाचे बीड येथील विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांना धमकावल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली होती. गुरुवारी (दि.21) न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
विभागीय भांडार शाखेतील सहायक पदावरील महिला कर्मचार्याने नियोजित काम करण्यास नकार दिल्याने पर्यवेक्षकाच्या अहवालावरुन 15 जानेवारी रोजी विभागीय भांडार अधिकार्यांनी निलंबित केले आहे. याशिवाय इतर तीन कर्मचार्यांवरही कामात हलगर्जी केल्याचा ठपका ठेऊन निलंबनाची कारवाई केलेली आहे.बुधवारी दुपारी 4 वाजता विभागीय नियंत्रक जगनोर यांच्या दालनात घुसून वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष शिवराज बांगरसह इतरांनी ’महिला कर्मचार्यास निलंबित का केले’ असा प्रश्न करत अर्वाच्च शिवीगाळ करुन विनयभंग व ट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्याची धमकी दिली होती. जगनोर यांच्या फिर्यादीवरुन जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर, प्रशांत बोराडे, राजेंद्र कोरडे, उमेश तुळवे, किरण वाघमारे, सचिन मेघडंबर व इतर तीन यांच्यावर शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करुन धमकावल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. बुधवारी अटक केलेल्या प्रशांत बोराडे, राजेंद्र कोरडे व उमेश तुळवे यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. उर्वरित आरोपींचा शोध सुरु असल्याचे उपनिरीक्षक शैलेश शेजुळ यांनी सांगितले.
Leave a comment