27 जुगारी ताब्यात; साडेअठरा लाखांचा मुद्देमाल जप्त
अंबाजोगाई । वार्ताहर
अंबाजोगाई-साखर कारखाना रोडवर मोरेवाडी शिवारात आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक आ. राजा यांच्या विशेष पथकाने बुधवारी (दि.20) अंबाजोगाई येथे दाखल होत कारखाना रोडवरील एका पत्त्याच्या क्लबवर छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी झन्ना-मन्ना जुगार खेळणार्या 27 जुगार्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल 18 लाख 59 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बुधवारी पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने अंबाजोगाईत दाखल झाले होते. यावेळी अंबाजोगाई-साखर कारखाना रोडवर मोरेवाडी शिवारात काही व्यक्ती झन्ना-मन्ना (फेक पत्ता) नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख सहा. पोलीस निरिक्षक विलास हजारे यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा झाल्यानंतर त्यांनी रात्री 9.30 वाजता पथकातील कर्मचार्यांसह सदर ठिकाणी छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी तीन गटात 27 व्यक्ती जुगार खेळत आणि खेळवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्या सर्व जुगार्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 7 लाख 57 हजार दोनशे रुपयांच्या रोख रकमेसह 11 दुचाकी, 1 चारचाकी, मोबाईल असा एकूण 18 लाख 59 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी एपीआय विलास हजारे यांच्या फिर्यादीवरून सतीश धोंडीराम चामनर, दत्ता गोविंद साखरे, विशाल पंडितराव चाटे, सय्यद सुलतान सय्यद दस्तगीर, सचिन बालासाहेब गुळभिले, वाहीद बेग खालील बेग, आनंद जगन्नाथ कदम, पुरुषोत्तम संजय कदम, अक्षय विश्वंभर काळे, अमोल दिलीपराव लोमटे, नितीन उर्फ तुळशीराम पांडुरंग यादव, ज्ञानेश्वर उर्फ माऊली पतंगे, नितीन कैलास साठे, राहुल भगवानराव रेणापुरे, सय्यद इलाही पाशा, देविदास काशिनाथ चौगुले, गोविंद राजाभाऊ शेप, एजाज शेख फरहाद, अनिल मुकुंदराव पिसाळ, भैरवनाथ सिद्धराम घोगरे, प्रमोद सिद्धरामअप्पा पोखरकर (सर्व रा. अंबाजोगाई), भगवान विठोबा वैद्य, नितेश मधुकर वैद्य, अहमद इब्राहीम बागवान (रा. घाटनांदूर), नासेरखान शेरखान, निलेश अशोक फड (रा. परळी) आणि राम बली निसार (रा. अलाहबाद, उत्तर प्रदेश) या 27 जुगार्यांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विलास हजारे, पो.ना. राऊत, पो.कॉ. बास्टेवाड, मोरे, इनामदार, कोलमवाड, तौर यांनी पार पाडली. एवढ्या मोठ्या संख्येने जुगारी पकडले गेल्याने शहरात खळबळ उडाली असून कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.
Leave a comment