मुख्याधिकारी किशोर सानप यांची शहरात फेरी
अठ्ठावीस किलो पाचशे प्लास्टिक जप्त!
शिरुर कासार । वार्ताहर
स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत प्लास्टिक मुक्त शहर आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात प्लास्टिक विरोधी धडक मोहीम राबविण्यात आली आहे.या मोहिमेत जवळपास अठ्ठावीस किलो पाचशे ग्राम प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.मुख्याधिकारी किशोर सानप यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता राहुल देशमुख,वसुली लिपीक नामदेव घुगे,जगदीश तगर,अक्षय सूरवसे,कौसर शेख,शहादेव गायकवाड,शरद गवळी,प्रणांकुर दगडे,हनुमान कानडे यांनी हि कारवाई केली.
नगरपंचायत प्रशासनाच्या मार्फत व्यापारी बांधवांना आवाहन करण्यात आले असून प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णतः बंद करावा अन्यथा प्लास्टिक पिशव्या आढळून आल्यास पाच हजार रुपये दंड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.शिवाय दुकानाबाहेर कचरा टाकण्यासाठी डबा ठेवून दुकान परिसरात कोठेही कचरा होऊ देवू नये तसे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
नागरिकांनी सामानाची खरेदी करण्यासाठी किंवा घराबाहेर पडताना कापडी पिशवी घेऊनच निघावे.घंटागाडी आल्यावर ओला आणि सुका कचरा वेगळा टाकण्याचे आवाहन देखील मुख्याधिकारी किशोर सानप यांनी केले आहे.शहरात कोठेही विनापरवाना बॅनर,बोर्ड किंवा फ्लेक्स लावू नये तसे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगून स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात शहर सहभागी झाले असून शहराला जास्तीत जास्त सुंदर ठेवण्याचे आवाहन किशोर सानप यांनी केले आहे.
Leave a comment