आष्टी । वार्ताहर
कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा झालेला नावलौकिक हा एका दिवसात झालेला चमत्कार नाही. त्यासाठी खूप मोठे परिश्रम घ्यावे लागले आहेत. राज्यात लासलगाव नंतर कड्याच्या कांदा बाजारपेठेचे राज्यभर नाव घेतले जाते या ठिकाणावरून परदेशातील अनेक देशात कांदा निर्यात होत असून यापुढे शेतकर्यांनी दर्जेदार कांदा उत्पन्न वाढीसाठी आधुनिक पद्धतीचा वापर करण्याचे आवाहन आ. सुरेश धस यांनी केले
कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने कांदा उत्पादक शेतकर्यांसाठी मार्गदर्शक शिबीर घेण्यात आले. त्याप्रसंगी आमदार धस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषिभूषण तथा तज्ञ कांदा उत्पादक शेतकरी बाबासाहेब पिसोरे, तहसीलदार शारदा दळवी, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर ,पंचायत समितीचे सभापती बद्रीनाथ जगताप, विक्रमी कांदा उत्पादक शेतकरी जिजा बापू करडुळे, सरपंच अनिल ढोबळे, बाजार समितीचे सभापती दत्तात्रय जेवे, उपसभापती शिवाजी अनारसे ,रमजान तांबोळी,सचिव हनुमंत गळगटे आदी मान्यवर उपस्थित होते. ते आ.धस म्हणाले, आष्टी तालुक्यात दिवसेंदिवस कांद्याचे उत्पादन वाढत चालले आहे. त्यासाठी तालुक्यातील कृषिभूषण बाबासाहेब पिसोरे यांनी अत्यंत तळमळीने शेती करून कांदा उत्पादन वाढीसाठी शेतकर्यांना प्रोत्साहित केले आहे. यांना कांद्याचे डॉक्टर म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तालुक्यामध्ये एकरी 14 टनांपर्यंत कांदा उत्पादित केला जातो ही अभिमानाची व भूषणाची गोष्ट आहे. तालुक्यातील धिर्डी येथील शेतकरी जिजाबापु करडुळे यांनी सात एकर मध्ये 25 लाख रुपयांचा कांदा उत्पादित केला हा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
तालुक्यातील शेतकर्यांसाठी बाबासाहेब पिसोरे यांनी शंभर वर्षे जगावे व शेतकर्यांना मार्गदर्शन करीत राहावे अशी इच्छा व्यक्त केली.बाजार समितीमध्ये कोणतेही शेतकर्यांची तक्रार येऊ न देण्यासाठी मी व सर्व बाजार समितीचे पदाधिकारी प्रयत्नशील असून यापुढील काळात बाजार समिती मध्ये आणखी सुविधा देण्यात येतील. येथील रस्ते व इतर भौतिक सुविधा लवकरच देण्यात येणार आहेत त्यामुळे बाजार समितीची बाहेर विनाकारण कोणी बदनामी करू नये चुकीचा अपप्रचार करून नाव खराब न करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी सर्व संचालक मंडळ, कांदा व्यापारी बबलू तांबोळी, राजू खलाटे, समद शेख ,निसार शेख ,दादासाहेब थोरवे, लक्ष्मण ननवरे ,लक्ष्मण बांदल ,शेतकरी गौतम आजबे,अशोक झिंजूरके,बाळासाहेब कर्डीले, राम मधुरकर,नागेश कर्डीले, संपत कर्डीले,हिराशेठ बलदोटा, संजय मेहेर यांच्यासह आष्टी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a comment