वडवणी । वार्ताहर
नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांच्यावर स्थापत्य अभियंत्याने वडील व मामांकरावी हल्ला घडवून आणल्याची घटना मंगळवारी (दि.19) सायंकाळी सव्वा सहा वाजता घडली होती. या प्रकरणी स्थापत्य अभियंत्यासह त्यांचे वडील व मामा यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी वडवणी पोलिसांनी घटनास्थळावरुन ताब्यात घेतलेल्या दिलीप मेटे व सुनील कदम यांना बुधवारी (दि.20) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अभियंता सुमितकुमार मेटे फरार असून अधिक तपास सुरु असल्याचे सहायक निरीक्षक नितीन मिरकर यांनी सांगितले.
मुख्याधिकारी पाटील यांनी मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजता बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियंता सुमितकुमार मेटे यास घरकुल बांधकामाची यादी मागवली होती. यावेळी ’मी यादी देत नाही, काय करायचे ते कर’अशी उध्दट भाषा वापरुन शिवीगाळ केल्याची खोटी केस करण्याची धमकी दिली. यावर पाटील यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा ’तू मला ओळखत नाही, थांब तुला दाखवतो’ अशी धमकी देऊन मेटे निघून गेला. सायंकाळी सव्वा सहा वाजता पाटील हे दालनात काम करत बसलेले असताना अभियंता सुमितकुमार मेटे याचे वडील दिलीप मेटे व मामा सुनील कदम हे दालनात आले. दिलीप मेटे याने शिवीगाळ केली तर सुनील कदमने गचुरे पकडून कार्यालयाबाहेर खेचत आणले. त्यानंतर दिलीप मेटे याने आपल्याकडील रॉडने पायावर, हातावर व उजव्या खांद्यावर मारहाण केली. यावेळी सुनील कदमने शिवीगाळ करत चाकूने हातावर वार दोन वार केले. यावेळी इतर कर्मचार्यांनी सोडवासोडव केली. सहायक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर व सहकार्यांनी तेथे धाव घेत दिलीप मेटे व सुनील कदमला ताब्यात घेतले. पाटील यांच्या फिर्यादीवरुन तिघांवर शासकीय कामकाजात अडथळा व कट करुन हल्ला केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला.
Leave a comment