मृत पक्षांमध्ये दहा टिटव्या तर दोन पाणकोंबडया
आष्टी । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील केरूळ गावापासून जवळ असलेल्या खडकळी तलावाच्या काठी शुक्रवारी दहा टिटवी तर दोन पाणकोंबडी पक्षी कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पशुसंर्वधन विभागाच्या अधिकार्यांनी पाहणी केली असून सदरील पक्षी तीन दिवसापूर्वी मृत झालेले असल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी घेता आले नसल्याची माहिती आष्टीचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मंगेश ढेरे यांनी दिली.
पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे अनेक कावळ्याचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाल्यानंतर आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथेही दोन मृत कावळे आढळे होते. तसेच शिरापुर येथे साडेचारशे कोंबड्या दगावल्याचे उघडकीस आल्याने बर्ड फ्ल्यूची धास्ती वाढत आहे. आता तालुक्यातील केरूळ येथील खडकळी तलावाच्या काठी शुक्रवारी दहा टिटवी व दोन पाणकोंबडी पक्षी मृत होऊन कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पक्ष्यांचा मृत्यू पक्षी तीन दिवसा पूर्वी झाला असल्याने त्यांचे तपासणीसाठी नमुने घेता आले नाहीत. यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याची माहिती तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. मंगेश ढेरे यांनी दिली आहे.
Leave a comment