जिल्ह्यात 111 ग्रा.पं.साठी 83 टक्के मतदान
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात 111 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि.15) 424 केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. 842 जागांसाठी 1926 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून सायंकाळी साडेपाच अखेरपर्यंत जिल्ह्यात एकुण 83.58 टक्के मतदान झाले. काही मतदान केंद्रांवर दरम्यान, किरकोळ बाचाबाची व वादाचे प्रसंग वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपणार्या जिल्ह्यातील 129 ग्रा.पं.चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मतदानापूर्वी 18 ग्रामपंचायतींच्या निवडी बिनविरोध निघाल्या होत्या. त्यानंतर उर्वरित 111 ग्रामपंचायतींच्या 842 जागांसाठी 1926 उमेदवार निवडणूकीला सामोरे गेले. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह पहायला मिळाला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात 71.17 टक्के इतके मतदान झाले होते. दुपारी काही वेळ मतदान केंद्रांवर मतदारांचा ओघ कमी झाला होता. मात्र, चार वाजेनंतर पुन्हा मतांचा टक्का वाढला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 83.58 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांनी दिली.मतदार संख्या अधिक असलेल्या ग्रामपंचायतींमधील केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावाव्या लागल्या.कोरोना विषाणूच्या अनुषंगाने ठिकठिकाणी सॅनिटायझरची सुविधा होती. शिवाय मास्क लावणेही बंधनकारक केले होते. ओळखपत्राचा पुरावा दाखवूनच मतदानासाठी परवानगी देण्यात आली. मात्र, काही ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचेही पाहावयास मिळाले.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी सर्व मतदान केंद्र परिसरात आवश्यक तो पोलीस बंदोबस्त तैनात होता. पोलीस अधीक्षक आर. राजा, अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार, स्वाती भोर सर्व हालचालींवर लक्ष ठेऊन होते. सहा उपविभागीय अधिकार्यांसह गुन्हे शाखेेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत हे पेट्रोलिंग करत होते. राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या,10 निरीक्षक, 119 सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, 347 होमगार्ड तसेच 849 पोलीस अंमलदार बंदोबस्तवर होते.दरम्यान जिल्ह्यातील 18 ग्रा.पं.निवडणूकीपूर्वी पुर्णत: बिनविरोध ठरल्या आहेत. यात बीड तालुक्यातील मौजे बह्मगाव, मौजवाडी, कातरवाडी, कोळवाडी, वंजारवाडी या 5 ग्रा.पं.चा समावेश आहे. शिवाय गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी, माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी, धारुर तालुक्यातील कोथिंबिरवाडी, केज तालुक्यातील सिंधी, आंधळेवाडी, घाटेवाडी व मोठेगाव अंबाजोगाई तालुक्यातील मूर्ती,केंद्रेवाडी, हनुमंतवाडी, वाकडी,परळी तालुक्यातील वंजारवाडी व आष्टी तालुक्यातील शेरी बु. या 18 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
मतमोजणी 18 जानेवारीनंतर
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांचेच लक्ष निकालाकडे असणार आहे. 18 जानेवारी रोजी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने तहसीलदार मतमोजणीची तारीख, ठिकाण व वेळ निश्चित करणार आहेत. त्यामुळे उमेदवारांसह मतदारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
Leave a comment