आरोग्य विभागाने टाळ्या वाजवून लस व्हॅन केली केंद्रावर रवाना
बीड । वार्ताहर
कोव्हीड-19 लस बुधवारी बीडमध्ये आल्यानंतर गुरूवारी लगेच लसीकरण केंद्रांवर पाठविण्यात आली. तत्पूर्वी लस घेवून जाणार्या वाहनाची पुजा करून गुरुवारी (दि.14) आरोग्य विभागाने टाळ्या वाजवून वाहनाला केंद्राच्या दिशेने
निरोप दिला. आरोग्य विभागाने हा एक सोहळा बनविला.
कोरोना लसीकरणासाठी बीड जिल्ह्यात आतापर्यंत 14 हजार 609 आरोग्य कर्मचार्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. आता लसीकरणाच्या पहिल्या टप्यात बीडला 17 हजार 640 डोस प्राप्त झाले आहेत. यात प्रत्येकाला दोन डोस
दिले जाणार असून यात 8 हजार 820 सेवकांना प्रथम लस दिली जाईल. बुधवारी लस मिळाल्यानंतर गुरूवारी दुपारी ती एका वातानुकूलीत वाहनातून लसीकरण केंद्राच्या ठिकाणी पाठविण्यात आली.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी नारळ फोडले. त्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवित लसीच्या वाहनाला निरोप दिला. यावेळी नोडल ऑफिसर डॉ.संजय कदम, डॉ.एल.आर.तांदळे, डॉ.सचिन शेकडे, डॉ.घुबडे,
डॉ.अशोक गवळी, डॉ.संतोष गुंजकर, डॉ.पी.के.पिंगळे, हातवटे, बागलाने आदींची उपस्थिती होती. दरम्यान आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार अगोदर 14 केंद्र तयार केले होते. त्यात पुन्हा कमी होऊन ते 9 झाले. बुधवारी ती संख्या
सहावर आली होती. आता गुरूवारी आणखी केजला वगळून पाचवर आली आहे. आता बीड, अंबाजोगाई, आष्टी, गेवराई, परळी या पाच ठिकाणी नियोजन केले आहे. लसीकरणदरम्यान काही गुंतागुंत झाल्यास आवश्यक प्रशिक्षण व
तयारी करण्यात आली आहे. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी 108 रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा स्तरावर कंट्रोल रुम तयार करण्यात आली असून संपर्क क्रमांक 0242-228500 हा आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली.
Leave a comment