आज अहवाल सादर होणार; चुकीचे काम करणारे उघडे पडणार?
बीड । वार्ताहर
ऊसतोडीसाठी जिल्ह्यातून दरवर्षी लाखो मजूर स्थंलातरित होतात. अशावेळी त्यांच्या पाल्यांची व्यवस्था व्हावी म्हणून जि.प.कडून जिल्ह्यात दरवर्षी हंगामी वसतीगृह सुरु केले जातात.मात्र या वसतीगृहात नियमानुसार काम होते का? तसेच सर्व व्यवस्था केली जाते का? मजुरांचे पाल्य संख्या जितकी दाखवली जाते तितके विद्यार्थी उपस्थित असतात का? या व इतर सर्व मुद्यांची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील सर्व हंगामी वसतीगृहांची एकाचवेळी तपासणी करण्याचे आदेश जि.प.प्रशासनाला दिले अन् सगळी यंत्रणा शनिवारी (दि.9) सकाळपासून वसतीगृहांवर धडकली. दरम्यान आज रविवारी सर्व वसतीगृह तपासणीचा अहवाल सीईओंना सादर केला जाणार आहे.
बीड जिल्ह्यात ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी जिल्हा परिषदतंर्गत ंहंगामी वस्तीगृह सुरू करण्यात आले आहेत. दोन दिवसापुर्वीच सीईओ अजित कुंभार यांनी बीड तालुक्यातील मंझेरी हवेली येथील वसतीगृहाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी तेथील सुविधांची पाहणी करून विद्यार्थ्यांची पटसंख्या तपासली होती. त्यानंतर शनिवारी सीईओ कुंभार यांनी थेट हंगामी वसतीगृह तपासणीचे आदेश जारी केले. जिल्ह्यात एकाचवेळी वसतीगृहांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकार्यांना दिले आहेत. या तपासणीसाठी एका वसतीगृहासाठी एक स्वंतत्र अधिकारी नियुक्ती केला गेला आहे. त्यामुळे दिवसभरात त्या अधिकार्याने एकाच वसतीगृहाची तपासणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा असे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने अधिकार्यांकडून तपासणी सुरु झाली.
शिक्षण विभागाला बाजूला ठेवत इतर
विभागप्रमुख लावले कामाला!
हंगामी वसतीगृहांच्या तपासणीचे आदेश देताना सीईओ कुंभार यांनी शिक्षण विभागातील अधिकार्यांना तपासणीच्या मोहीमेपासून दूर ठेवत जि.प.च्या कृषी, पंचायत, पाणीपुरवठा, महिला बालकल्याण व अन्य विभागातील अधिकार्यांना वसतीगृह तपासणीची जबाबदारी सोपवली आहे. तसेच तालुकानिहाय अधिकार्यांची अदलाबदल करून सीईओंनी वस्तीगृह तपासण्याचे आदेश देवून वसतीगृहांची खरी स्थिती समोर आणण्यासाठी चांगला निर्णय घेतला आहे. रविवारी रात्रीपर्यंतच सर्व अहवाल सादर करण्याचे आदेशही सीईओंनी संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे अहवालातून कोणती माहिती समोर येते याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
अशी होतेय तपासणी
जिल्ह्यात ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी चालवल्या जात असलेल्या हंगामी वसतीगृहातील विद्यार्थी संख्या, तसेच विद्यार्थ्यांना दिले जाणारे जेवण, त्यांची पटसंख्या व वसतीगृहाच्या ठिकाणी केल्या गेलेल्या सुविधा याची तपासणी यादरम्यान केली जाणार असून त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल सीईओंना सादर केला जाणार आहे. महत्वाचे हे की, एका तालुक्यातील अधिकारी त्याच तालुक्यातील वस्तीगृहांची तपासणी न करता अन्य तालुक्यात तपासणी करणार आहेत.
Leave a comment