बीड । वार्ताहर
राष्ट्रवादीला स्वत:च्या सभापतीवर त्यांना अविश्वास का आणावा लागला? हा प्रश्न राष्ट्रवादीला विचारावा लागेल, अशी खोचक टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. परळी पंचायत समितीत सामाजिक न्याय आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का देत भाजपची संख्या शून्यावर आणली.
पंचायत समिती सभापती उर्मिला गित्ते यांच्याविरोधातील अविश्वास ठरावादरम्यान भाजपच्या तीन सदस्यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सभापतींविरोधात अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं. यावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडेंनी धनजंय मुंडेंवर जोरदार टीका केली. सरकार येऊन अजून वर्ष झालं नाही आणि जर अशापद्धतीने सरकारवर विविध संस्थांवर अशापद्धतीने अविश्वास आणावा लागत असेल. तर हे वातावरण चांगलं आहे, असे मला वाटत नाही, असेही पंकजा मुंडेंनी सांगितले.
भाजपचे पंचायत समितीचे जे सदस्य आहेत, ते आमच्याशी प्रामणिक आहे. ते अविश्वास ठराव झाल्यानंतर थेट मला येऊन भेटले आहेत. हा निर्णय पंचायत समितीच्या कार्यभारावरील असंतोष असलेल्या पद्धतीमुळे घेतला आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. मी यावर काहीही प्रतिक्रिया देण्याचा संबंध नाही. कारण राष्ट्रवादीच्या सभापतीवर राष्ट्रवादीचा अविश्वास आहे. राष्ट्रवादीने त्यांच्या सभापतीवर अविश्वास आणण्यासाठी ज्या तीन सदस्यांना सोबत घेतले, ते तिघेही भाजपचे सदस्य होते. त्यांच्याच कामावर असमाधानी असल्याने त्यांनी त्यांना साथ दिली. पण त्याचा अर्थ राष्ट्रवादीने अशी बातमी पेरली की हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला, असेही त्यांनी सांगितले.
पंचायत समितीत भाजप शून्यावर!
परळी पंचायत समिती सभापती उर्मिला शशिकांत गित्ते यांच्याविरोधात गुरुवारी दुपारी बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. 12 सदस्यांची संख्या असलेल्या परळी पंचायत समितीच्या सभापती विरुद्ध अविश्वास ठराव संमत करण्यात आला होता. आज यावर मतदान झाले. मतदानावेळी राष्ट्रवादीच्या सदस्यांना चक्क भाजपच्या सदस्यांनी साथ देऊन गित्ते यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आणि तो ठराव पारितही झाला.12 सदस्य असलेल्या परळी पंचायत समितीमध्ये धनंजय मुंडे यांच्या गटाचे 8 सदस्यांसह वर्चस्व आहे. त्यातच भाजपचे आणखी 3 सदस्य नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले असल्याने आता पंचायत समितीच्या कार्यकारिणीत भाजपचे संख्याबळ शून्य झाले आहे. भाजपचा एक सदस्य आधीच अपात्र झाला आहे. त्यामुळे परळीत भाजपला मोठा धक्का बसला आहे.
उर्मिला गित्तेंनी सभापतीपद गमावलं
परळी पंचायत समिती सभापती उर्मिला शशिकांत गित्ते यांच्याविरोधात गुरुवारी दुपारी बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. याप्रसंगी भाजपच्या सदस्यांनी चक्क राष्ट्रवादीला मदत केली. परळी पंचायत समिती सभापती म्हणून उर्मिला शशिकांत गित्ते या काम पाहत होत्या. मात्र राष्ट्रवादीच्या सदस्यांना चक्क भाजपच्या सदस्यांनी साथ देऊन गित्ते यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आणि तो ठराव पारितही झाला.
शशिकांत गित्तेंना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परळी पंचायत समिती सभापतीविरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आलाय. तरीही शशिकांत गित्ते यांच्या घरासमोर दीडशे ते दोनशे कार्यकर्त्ये जमा झाले होते. तेव्हा पोलिसांनी ती गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यानंतर पोलिसांनी गित्ते यांना अटक केल्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली. त्यावेळी 2 गावठी पिस्तुल, 4 जिवंत काडतूस आणि लाठ्या-काठ्यासह अन्य धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Leave a comment