बीड । वार्ताहर
जिल्ह्यात चोरी, घरफोडी व वाहन चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. मावळत्या वर्षाला निरोप दिला जात असतांना बीड शहर, केज व धारुर तालुक्यातील कोळपिंप्री याठिकाणी चोरी, घरफोडीच्या घटना घडल्या. बीड शहरातील एका रुग्णालयातून अज्ञाताने तब्बल 53 हजाराची रक्कम लंपास केली. तर केज शहरातील वकीलवाडी येथे घरफोडीची घटना घडली. धारुर तालुक्यातील कोळपिंप्री जिल्हा परिषद शाळेचे ग्रंथालय फोडून चोरट्यांनी पुस्तके लंपास केली. या गुन्ह्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलीसांसमोर आहे.
बीड शहरातील पेठ बीड भागात डॉक्टर लक्ष्मण जाधव यांचे खासगी रुग्णालय आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास या रुग्णालयातील कॅबीनमधील टेबलच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेली 53 हजाराची रक्कम अज्ञाताने हातोहात लंपास केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉ.जाधव यांनी पेठ बीड ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी गुरुवारी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
केज शहरातील वकीलवाडी भागात गुरुवारी (दि.31) पहाटेच्या सुमारास घरफोडीची घटना घडली. काजल मयुर अंधारे यांनी याबाबत केज ठाण्यात फिर्याद नोंदवली. चोरट्यांनी अंधारे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याचे 40 हजारांचे दागिने व 25 हजारांची रोकड असा 65 हजारांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर काजल अंधारे यांनी केज ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरुन अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद झाला. पो.नि.प्रदिप त्रिभुवन अधिक तपास करत आहेत.
Leave a comment