औरंगाबाद । वार्ताहर

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरु आहेत. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. आता लवकरच शिवसेनेचं स्वप्न सत्यात येणार असल्याचं दिसत असताना महाआघाडीतील प्रमुख घटक कॉंग्रेसने या नामांतरणाला विरोध केला आहे.

 

कॉंग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी या नामांतरणाला विरोध करताना म्हटलं की, "संभाजीनगर नाव करण्याला आमचा विरोध असेल. महाविकास आघाडी विकासाच्या मुद्द्यावर स्थापन करण्यात आली आहे. सरकारनं सामान्य माणसाचं जीवन सुखी कसं होईल हे पाहायचं, हा कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या मुख्य हेतू आहे .महाविकास आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये अशाप्रकारे शहरांचं नाव बदलण्याचं ठरलेलं नाही."

 

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, "नाव बदलण्याचा हा अजेंडा आम्हाला मान्य नाही .नाव बदलावर काँग्रेसचा विश्वास नाही. शहराच्या नावात बदल करुन काही होत नाही, काही गोष्टींचा इतिहास बदलू शकत नाही. आम्ही विकासाची वाटचाल सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून करत आहोत, हे आमचे सूत्र आहे आणि हे राज्य घटनेच्या मूलभूत तत्त्वांना धरुन आहे. शहराच्या नावात बदल करणे ही गोष्ट आम्हाला मान्यच नाही. या प्रस्तावाला निश्चितच आमचा विरोध राहणार."

औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावे असा प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी नव्याने पाठविला असल्याचे वृत्त वाहिन्यावरुन अलिकडेच प्रसारीत झाले होते. वास्तविक अशा प्रकारचा प्रस्ताव गेल्या वर्षी म्हणजे ४ जानेवारी रोजी पाठविण्यात आला होता. त्या वेळीही रेल्वे विभागाकडे वारंवार पाठपुरावा करुनही त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नव्हते. मात्र नामांतराचा प्रस्ताव पाठविल्याचे सांगण्यात येत होते. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आलेल्या नामांतराच्या मुद्द्यावर शिवसेनेशी थेट मतभेद असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. गेल्या काही महिन्यापासून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आणला जात होता. शहरातील चौकात ‘लव्ह औरंगाबाद’, ‘सुपर संभाजीनगर’ असे फलक लावण्यात आले होते. त्यावरुन सुरू असणाऱ्या वादाच्या चर्चेला नामांतराचा प्रस्ताव पाठविल्याची माहिती सांगण्यात आल्याने कॉंग्रेसची भूमिका थोरात यांनी स्पष्ट केले.

राज्यपालांचे वर्तन लोकशाही बाधा आणणारे
विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ जागांची यादी मंत्रीमंडळाच्या मंजुरीनंतर राज्यपालांकडे पाठविण्यात आली आहे. त्याला बराच कालावधी झाला आहे हे खरेच. खरे तर मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर राज्यपालांकडून तातडीने नियुक्ती होण्याची गरज होती. मात्र तसे झाले नाही हे राज्यपालांचे वर्तन लोकशाहीला बाधा आणणारे आहे अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

मुद्रांक शुल्काच्या सवलतीमुळे व्यवहार वाढले
मुद्रांक शुल्कामुळे दिलेल्या सवलतीमुळे सात लाखांपर्यंत होणारे व्यवहार आता ११ लाखांवर पोहचले आहेत. असे असले तरी गेल्या वषीच्या तुलेनत अजूनही १५ टक्के तूट आहे. पण हाती घेतलेल्या उपक्रमाचे अर्थतज्ज्ञांनी कौतुक तर केलेच पण पंतप्रधानांनीही राज्य सरकारच्या या कृतीचे कौतुक केले होते. येत्या काळात आणखीही व्यवहार वाढतील असेही महसूल मंत्री थोरात म्हणाले.

शिवसेनेची जुनी मागणी
औरंगाबादचे नाव बदलून ते संभाजीनगर करण्यात यावं यासाठी 19 जून 1995 साली औरंगाबाद महापालिकेनं तसा प्रस्ताव पाठवला होता. राज्यात युतीची सत्ता असताना संभाजीनगर नावाची अधिसूचनाही काढण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करुन आव्हान देण्यात आलं होतं. सरकारला शहराचं नाव बदलण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगत सरकारच्या बाजूनं निर्णय दिला. नंतरच्या काळात राज्यात पुन्हा सत्तेत आलेल्या आघाडी सरकारनं हा नाव बदलण्याचा प्रस्ताव मागे घेतला.

 

न्यायालयाच्या त्यावेळच्या निर्णयाचा संदर्भ घेऊन औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करावं असा नवा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाला पाठवला आहे. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात येईल. केंद्राच्या मंजुरीनंतर नव्या नावावर शिक्कामोर्तब होईल. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याला एमआयएमचा विरोध आहे.

 आता बघू... बाळासाहेबांचा शब्द महत्त्वाचा की सत्तेची

मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही. पण, या नावबदलासाठी हलचाली सुरू असल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते, त्यानंतर नामांतरणाला आमचा विरोध असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितलंय. त्यावरुन आता राजकारण सुरू झाल्याचं दिसून येतंय.  

शिवसेना नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख नेहमीच संभाजीनगर असाच केला जातो. विशेष म्हणजे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक बातमी शेअर करताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता. तर, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनीही आपल्या पत्रावर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केला होता. त्यामुळे, सरकारकडून औरंगाबादचे नामकरण करुन संभाजीनगर हे नवीन नाव ठेवण्याच्या हालचाली होत असल्याचं चर्चा होती. यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर, भाजपा आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शिवसेनेला डिवचले आहे. ''काँग्रेसने सांगून टाकले संभाजीनगर होणार नाही! आता बघू... बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी!'' संभाजी राजेंचा स्वाभिमान महत्वाचा की मुख्यमंत्री पदाची खुर्ची !!!, असे ट्विट करत नितेश राणेंनी शिवसेनेवर शाब्दीक प्रहार केलाय.  

शिवसेनेवर टीका करण्याची संधी राणे बंधुंकडून सोडली जात नाही. त्यातच, महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसने संभाजीनगर नावावरुन आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर नितेश राणेंनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.  

 

सामाजिक मतभेदाला स्थान नाही

महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, पण नामांतराला आमचा विरोध राहिल, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलंय. महाविकास आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण, अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय. आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याचा आधारावर निर्माण झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब ठाकरेंनी ठामपणे सांगितंलय. 

मनसेची मागणी

शिवसेना हा पक्ष गेल्यावेळी केंद्रात आणि राज्यातही होता. मात्र असे असतानासुद्धा औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करावे यासाठी त्यांनी कुठलाही आवाज उठवला नाही. तर संभाजीनगर करण्याच्या मागणीवरून शिवसनेने फक्त राजकरण केले आहे. त्यामुळे आता लोकांना याबातीत शिवसेनेकडून अपेक्षाही राहिली नसल्याचे मनसेच आमदार राजू पाटील यांनी म्हटले होते. तसेच, आता आम्ही यासाठी पुढाकर घेणार असून राज्य सरकाराला औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी भाग पाडणार असल्याचेही मनसेच्या पाटील यांनी म्हटले होते. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.