मोठा अपघात झाला तर जबाबदार कोण? प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज
बीड । वार्ताहर
तालुक्यातील मांजरसुंबा येथील राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल कन्हैय्या समोर राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापुर क्रमांक 52 वरील दुभाजक तोडुन त्याठिकाणी मातीचा रॅम्प तयार केलेला दिसला. याठिकाणी वाहने बेकायदेशीररित्या इकडून तिकडे जात वाहतुक नियमांची पायमल्ली करत आहेत. यावेळी हॉटेल व्यावसायिक यांना विचारल्यानंतर ‘केवळ आजच्या लग्नामुळे केलेले आहे. आज संध्याकाळी काढून टाकतो, उद्या सकाळी तुम्हाला दिसणार नाही’ असे उत्तर दिले गेले; मात्र यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण होवू शकतो. जिल्हा प्रशासनाने याकडे वेळीच कार्यवाही करण्याची गरज आहे
राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापुरवरील कन्हैय्या बीड रोड हॉटेल समोरचे चित्र पाहिले तर लग्नाची घाईगडबड..राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक तोडलेले,मातीचा कृत्रिम रॅम्प तयार केलेला, वाहने अर्ध्यामधुनच ईकडून तिकडे जातायेत. दरम्यान येथील दुभाजकच तोडायचा असेल तर बांधलाय कशासाठी? दुर्दैवाने भरधाव वाहनांमुळे या ठिकाणी अपघात जर झाला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित होत असून यापूर्वीच बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांना लेखी तक्रार केल्यानंतर काही काळापुरता हा रॅम्प हटवण्यात आला होता.परंतु रविवारी (दि.27) पुन्हा त्याठिकाणी रॅम्प केलेला आढळून आला. आता पुन्हा एकदा लेखी तक्रार करावी लागणार असून हॉटेल व्यावसायिक यांनी दुभाजक तोडुन रस्ता तयार केला असेल आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग आधिकारी, कर्मचारी यांनी दुर्लक्ष केले असले तरी जबाबदार नागरीकांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत, दुर्घटना टाळल्या पाहिजेत अशी अपेक्षाही सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी व्यक्त केली आहे.
महामार्ग तोडफोड प्रकरणी मंत्री गडकरींकडे तक्रार
राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापुर क्रमांक 52 वरील दुभाजक तोडुन रस्ता तयार करण्यात आल्या प्रकरणात संबधित दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी दि. 24 जून दि. 29 जून 2020,दि.13 जुलै2020 रोजी लेखी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी तक्रार केली होती.त्यानंतर दिवसापासून.17 जुलै 2020,रोजी जिल्हाधिकारी यांनी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग औरंगाबाद यांना पत्रक पाठवुन कार्यवाही करण्याविषयी सांगितले होते. परंतु अद्याप कारवाई करण्यात आली नाही याकडे डॉ.गणेश ढवळे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
‘धंदा’वाढवण्यासाठी चक्क महामार्गाच्या दुभाजकाचा केला रॅम्प!
मांजरसुंब्याच्या कन्हैया हॉटेलचालकावर प्रशासन मेहेरबान का?
धुळे-सोलापूर महामार्गावर मांजरसुंबा येथे जेवणाची सोय असलेली मोठी हॉटेल सुरु आहेत. मात्र येथीलच कन्हैया हॉटेलचालकाने चक्क अधिकचा ‘धंदा’ कमवण्यासाठी चक्क महामार्गाचा दुभाजक रॅम्पसारखा करुन वाहनचालकांना मांजरसुंब्याच्या उड्डाणपुलाला ‘वळसा’ घालून येण्याची वेळ येवू नये याची ‘काळजी’घेत त्या आडून आपला हॉटेल व्यवसाय चालवला आहे. वास्तविक नियमानुसार महामार्गावरील दुभाजक बुजवून अथवा तिथे रॅम्प तयार करुन वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देता येत नाही. मात्र या ठिकाणी सारेच नियम ‘धाब्यावर’ बसवत ‘धाबा,हॉटेल’चा व्यवसाय चालवला जात असल्याच्या तक्रारी नागरिक व्यक्त करु लागले आहेत.खुलेआम वाहने महामार्गावरील दुभाजकावरुन वळू लागली तर यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. महत्वाचे हे की, इतका गंभीर प्रकार घडलेला असताना जिल्हा प्रशासन मात्र संबंधित हॉटेल चालकावर मेहेरबान का? असा सवाल नागरिकातून विचारला जात आहे.
Leave a comment