जादा शुल्क आकारणाऱ्या रक्तपेढ्यांकडून पाच पट दंड वसूल करणार
मुंबई / राजन पारकर
राज्यात गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याच्या पाच पट दंड आकारला जाईल. जादा आकारण्यात आलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येईल. या कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालकांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास यांनी दिली. दरम्यान यासंदर्भात शासन निर्णयदेखील जाहीर करण्यात आला आहे.
राज्यामध्ये रक्तपेढ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे गैरप्रकार वारंवार होत असल्याच्या तक्रारी विविध निवेदनाद्वारे प्राप्त होत आहेत. यामध्ये थॅलेसिमया रुग्णांना रक्त न देणे, त्यांचेकडून प्रक्रिया शुल्क घेणे, संकेतस्थळावर दररोजचा साठा न दर्शविणे, तसेच प्लाझ्मा रक्त पिशवीसाठी विहित रकमेपेक्षा अवाजवी रक्कम आकारणे अशा आशयाच्या तक्रारी/निवेदने प्राप्त होत आहेत.
राज्यात अशाप्रकारे गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय/राज्य संक्रमण परिषद/शासन यांचेकडून रक्त व प्लाइमा तसेच प्रक्रियेसाठी विहित केलेल्या दरापेक्षा अवाजवी रक्कम आकारणाऱ्या खाजगी रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण संचालक यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद/राज्य रक्त संक्रमण परिषद/शासन यांनी विहित केलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जादा प्रक्रिया शुल्क आकारल्यास जादा आकारलेल्या प्रक्रिया शुल्काच्या पाच पट दंड केला जाईल. यापैकी जादा आकरण्यात आलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येणार असून उर्वरीत रक्कम राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या खात्यावर जमा करण्यात येईल.
थॅलेसिमया/हिमोफिलिया/सिकलसेल व रक्ताशी निगडीत इतर आजारी रुग्णांकडे मोफत रक्त मिळण्याविषयी राज्य रक्त संक्रमण परिषदेने जारी केलेले ओळखपत्र असताना देखील अशा रुग्णांना प्रक्रिया शुल्क आकारल्यास प्रक्रिया शुल्काच्या तीन पट दंड केला जाईल. यापैकी प्रक्रिया शुल्क संबंधीत रुग्णास परत करण्यात येईल व उर्वरीत रक्कम राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या खात्यावर जमा करण्यात येईल.
सुचना फलकावर/संकेतस्थळावर पुरविलेल्या माहितीप्रमाणे रक्त उपलब्ध असताना देखील थॅलेसिमया/हिमोफिलिया/सिकलसेल व रक्ताशी निगडीत इतर आजारी रुग्णांना कोणतेही सबळ कारण नसताना रक्त वितरण करण्यास नकार दिल्यास रुग्णास द्यावे लागलेले प्रक्रिया शुल्क अधिक 1000/- रुपये दंड आकारला जाईल. प्रक्रिया शुल्क रुग्णास परत करण्यात येईल.
ई रक्तकोष व राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर रक्तसाठा व अनुषंगिक माहिती न भरल्यास प्रती दिन 1000 रुपये याप्रमाणे दंड आकारला जाईल. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर रक्तपेढीकडून जी माहिती भरणे अनिवार्य आहे. अशी माहिती न भरल्यास अथवा भरलेली माहिती अद्ययावत नसल्यास त्यासाठी विहित कालावधी संपल्यानंतरच्या कालावधीसाठी 500 रुपये प्रती दिन दंड आकारला जाणार आहे.
दंडात्मक कारवाईपूर्वी संबंधित रक्तपेढीला नोटीस देऊन त्यांचे म्हणणे मांडण्याची एक संधी देण्यात येईल. रक्तपेढीकडून वारंवार मार्गदर्शक तत्वे/ सूचनांचे उल्लंघन केले गेल्यास, अशा रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला कळविण्यात येईल व अशा रक्त पेढ्यांचा परवाना अन्न व औषध प्रशासनाकडून रद्द करण्यात येईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नवीन वन संहितेचे प्रकाशन तसेच इ वाहतुक परवाना पद्धतीचे विमोचन करण्यात आले. याच कार्यक्रमात यवतमाळ येथील अगरबत्ती केंद्रासाठी सायकल अगरबत्ती ब्रँड सोबत सामंजस्य करार झाला.
बैठकीस वन मंत्री संजय राठोड, पर्यावरण तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुनील लिमये, श्री. काकोडकर यांच्यासह नागपूर आणि पुणे विभागातील वन विभागाचे अधिकारी दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते
मा मुख्यमंत्री यांच्या भाषणातील मुद्दे
1. वन आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग
2. सोयीप्रमाणे काम करणे योग्य नाही. कुठली अडचण आली, संकट आले की आपल्याला वन आठवते. असे बरोबर नाही
3. ग्लोबल वॉर्मिंग ही संकटातच आठवत पण एकीकडे झाडांची कत्तल करायची आणि दुसरीकडे ग्लोबल वॉर्मिंगवर बोलायचे हे बरोबर नाही जे वन आज आपल्याकडे आहे ते जपले पाहिजे वाढवले पाहिजे. वन विभाग हे काम करत आहे त्यांना मी पुढच्या पिढीच्या वतीने धन्यवाद देतो
4. वनासाठी वन विभाग मनापासून काम करत आहे
5. जंगलातील वन्य जीवाना ही निसर्गाने घालून दिलेले नियम असतात ते त्याचे पालन ही करतात पण आपण मात्र आपल्या सोयीप्रमाणे नियम करतो, मोडतो. तसे होऊ नये म्हणून विभागाने तयार केलेली नवीन वन संहिता अतिशय महत्वाची. ही संहिता करणे गरजेचे होते. यातून वनांसदर्भातील एकत्रित माहिती मिळू शकेल. भाग 1 आणि 2 प्रसिद्ध केल्याबद्दल विभागाचे अभिनंदन
महाराष्ट्रालाच नाही देशाला यातून वनांचे महत्व कळेल.
नवीन वन संहितेच्या माध्यमातून वन विभागाने महाराष्ट्राच्या वन वैभवाचे लोकार्पण केले आहे
6. वन विभागाने प्रायोगिक तत्वावर सुरू केलेली इ वाहतूक परवाना पद्धती चांगली पण त्याचा दुरुपयोग होणार नाही याची वन विभागाने काळजी घ्यावी, वस्तुस्थिती तपासून परवाने द्यावेत
7. आज सायकल ब्रँडसमवेत अगरबत्ती साठी केलेल्या सामंजस्य कराराने गरीब दुर्गम भागात काम करणाऱ्या महिलांना वन विभागाने उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून दिला
8. मोहाप्रमाणे इतर वनौपज लोकांना उपलब्ध करून दिल्यास जंगल आपल्या जगण्यासाठी उपयुक्त असते हे लोकांना कळेल
9. कोरोनामुळे आपल्याला स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त जग पाहायला मिळाले
10. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी वन विभाग काम करत आहे. शासन भक्कमपणे या सर्व निर्णयाच्या पाठीशी उभे आहे अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यातील रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी
जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे
--मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
महाविद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठी महत्वाचा स्त्रोत आहे. मात्र, कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये बंद आहेत. तसेच रक्तदानात अग्रेसर असणाऱ्या बऱ्याच मोठ्या कंपन्या, कॉर्पोरेट हाऊस यांच्याकडून वर्क फ्रॉम होम सुरु असल्यामुळे रक्त संकलनामध्ये अडचणी येत आहेत.
५ ते ७ दिवस पुरेल एवढाच साठा
कोरोना विरोधाच्या लढाईत राज्यातील डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देत आहेत. या लढाईसाठी आवश्यक औषधे, सुविधांची कमतरता भासू नये यासाठी शासनस्तरावरुन सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतू राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या महाराष्ट्रातील ३४४ रक्तपेढ्यांमध्ये १९ हजार ०५९ रक्ताच्या युनिट आणि प्लेटलेटच्या २ हजार ५८३ युनिट आणि मुंबईतील ५८ रक्तपेढ्यांमध्ये ३ हजार २३९ रक्ताच्या युनिट आणि ६११ प्लेटलेट युनिट उपलब्ध आहेत. केवळ ५ ते ७ दिवस पुरेल एवढाच हा साठा आहे.
या पार्श्वभुमीवर येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या- छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करुन रक्त संकलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे, असे मुख्यमंत्री म्हणतात
Leave a comment