आष्टी । वार्ताहर
तालुक्यामध्ये मागील चार दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून दोघाजणांना बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले आहेत. शनिवारी (दि.28) सायंकाळी 6 वा. बिबट्याने आष्टी शहरापासून चार किमी अंतर असणार्या मंगरुळ येथील दिंडे वस्तीवरील मायलेकरावर हल्ला केल्याची घटना समोर आली असून यामध्ये त्यांना दुखापत झाली आहे. या मायलेकरावर आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत असून बिबट्याच्या या हल्ल्यामुळे आष्टीत आणखी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिलावती दत्तात्रय दिंडे (33) आणि अभिषेक दत्तात्रय दिंडे (15) हे मायलेकरं दिंडे वस्तीवरील आपल्या रानामध्ये तुरीच्या शेंगा तोडत असतांना बिबट्याने या दोघांवर हल्ला चढविला. यामध्ये शिलावती यांच्या हाताला आणि कमरेच्यावर दुखापत झाली असून अभिषेकच्या हातालाही बिबट्याचे दात लागले आहेत. या दोघांनी हल्ल्यानंतर आरडाओरड करण्यास सुरूवात केल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहाणी झाली नसून या प्रकारामुळे मात्र गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. धनवडे आणि मंगरूळ वस्तीच्या दरम्यान हा प्रकार घडला असून वन विभागाची पथके दिंडे वस्तीवर दाखल झाले असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
Leave a comment