नागनाथच्या दोन्ही मुलांची जबाबदारी माझी-धनंजय मुंडे
गर्जे कुटुंबियांना वनविभागाकडून 5 लाखांचा धनादेश सुपूर्द
आष्टी । वार्ताहर
’नागनाथ हा माझा अत्यंत निकटवर्तीय होता, मी त्याला दाजी म्हणायचो, माझ्या बहिणीची व नागनाथच्या दोन्ही मुलांची जबाबदारी मी स्वीकारतो असे म्हणत धनंजय मुंडे यांनी बिबट्याच्या हल्ल्यात मयत नागनाथ गर्जे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी नागनाथ यांचा मुलगा व मुलगी या दोन्ही अपत्याच्या शिक्षणाची जबाबदारी आपण स्वीकारत असून त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत नोकरी मिळण्यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
आष्टी तालुक्यातील सुरुडी व किन्ही या दोन ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात नागनाथ गर्जे, तसेच मामाच्या गावी आलेला नऊ वर्षीय यश उर्फ स्वराज भापकर अशा दोघांचा वेगवेगळ्या घटनेत मृत्यू झाला होता. त्यानंतर आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गर्जे यांच्या कुटुंबियांची तसेच यश उर्फ स्वराज भापकर याच्या मामाकडे असलेल्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले. नागनाथ गर्जे यांच्या आई, पत्नी व बहिणींनी धनंजय मुंडे दारात येताच ’माझा भाऊ आला’ म्हणत एकच हंबरडा फोडला, मुंडेंनी या परिवारास अत्यंत आपुलकीने धीर दिला. मयत नागनाथ गर्जे यांच्या कुटुंबास राज्य शासनाच्या वतीने 5 लाख रुपयांचा धनादेश यावेळी वनाधिकारी तेलंग यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच नागनाथ यांच्या दोन्ही मुलांच्या नावे योजनेप्रमाणे प्रत्येकी 5 लाख रुपयांचा एफडी करून त्याच्या पावत्या कुटुंबाकडे देण्याच्या सूचना ना. मुंडेंनी केल्या. त्याचबरोबर स्वराज भापकर याच्या मावशी काका यांसह अन्य नातेवाईकांचीही भेट घेऊन या चिमुकल्याच्या कुटुंबसही याच योजनेअंतर्गत 15 लाखांची मदत मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मुंडे यांच्यासह आष्टी पाटोदा शिरूरचे आमदार बाळासाहेब आजबे, साहेबराव दरेकर, बजरंग सोनवणे, शिवाजी राऊत, सतिश शिंदे, अण्णासाहेब चौधरी, रामकृष्ण बांगर, सुनील नाथ, शिवाजी नाकाडे, शिवाजी शेकडे, शिवाजी डोके यांसह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, वनविभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान या दोन घटनांमुळे आष्टी तालुक्यात भीतीचे वातावरण असून या बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून आखण्यात आलेल्या उपाययोजनांचा मुंडेंनी आढावा घेतला. आपण वनमंत्री संजय राठोड यांच्याशी या गंभीर विषयी चर्चा केली असून या बिबट्याला तातडीने पकडण्यासाठी नांदेड, जुन्नर, पुणे, औरंगाबाद, अमरावती आदी ठिकाणांहून शार्पशूटर व अन्य तज्ज्ञाची आणखी एक कुमक येथे दाखल होणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. तसेच येत्या तीन दिवसांच्या आत या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले नाही तर, आपण स्वतः शार्पशूटर मार्फत त्याला ठार करण्याची परवानगी वन्य जीव विभागकडून घेऊ असेही धनंजय मुंडे ग्रामस्थांशी बोलताना म्हणाले.
Leave a comment