क्षीरसागरांची ताकत चव्हाण यांच्या पाठीशी
आज बीडमध्ये मेळावा,खैरेंची उपस्थिती
बीड । वार्ताहर
औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. औरंगाबादनंतर बीड जिल्ह्यात सर्वाधिक मतदान आहे.त्यामुळे बीडचे मतदान निर्णायक ठरणारे आहे.महाविकास आघाडीचे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आ.सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज रविवार दि.29 रोजी सिंहगड लॉन्स येथे पदवीधर मतदारांचा मेळावा आयोजीत करण्यात आला असून आता प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांची ताकद पाठीशी असल्याने आ.चव्हाणांच्या विजयाचा मार्ग मोकळा होणार आहे.
पदवीधर निवडणूकीसाठी महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मराठवाडाभर दौरा करुन पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आ.चव्हाणांना निवडून देण्यासाठी आवाहन केले आहे. येत्या 1 डिसेंबर रोजी पदवीधरसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. तत्पूर्वी आता प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. आ.चव्हाण यांच्या प्रचाराचा अंतिम टप्पा असतानाच क्षीरसागर बंधूंनी मेळावा घेऊन मोठे मताधिक्य त्यांच्या पारड्यात टाकण्याचा निश्चय केला आहे. बीड जिल्ह्यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणारे एकगठ्ठा मतदान आहे. आता क्षीरसागरांची ताकद आ.चव्हाणांच्या पाठीशी असल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होणार असल्याची चर्चा होवू लागली आहे. आज होणार्या या मेळाव्यास शिवसेना नेते खा.चंद्रकांत खैरे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार व सहसंपर्क प्रमुख बदामराव पंडित, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर तसेच अनेक मान्यवरांची व पदाधिकार्यांची उपस्थिती राहणार आहे.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सतीश भानुदास चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज रविवारी शहरातील सिंहगड लॉन्स डी.पी.रोड येथे दुपारी 12 वा. भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात क्षीरसागर बंधूंची नेमकी कोणती भूमिका असेल याबाबत तर्क वितर्क व्यक्त केले जात होते. या मेळाव्यास शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी तसेच पदवीधर मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व सचिन मुळूक यांनी केले आहे.
Leave a comment