काकासमोर बालकाला नेले उचलून; किन्ही शिवारातील घटना
परिसरात बिबट्याची दहशत; ग्रामस्थ भयभीत
आष्टी । वार्ताहर
तालुक्यातील सुरडी येथील पंचायत समिती सदस्य पतीची बिबट्याने शिकार केल्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील किन्ही या गावात शेतवस्तीवर आजीकडे सुट्टीनिमित्त आलेल्या एका दहा वर्षीय मुलाची बिबट्याने शिकार केली. ही खळबळजनक घटना आज शुक्रवारी (दि.27) दुपारी 12 वाजण्याच्या घडली. यामुळे किन्ही गावासह परिसरातील गावांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. वनविभागाने तातडीने या नरभक्षक बिबट्यांचा शोध घेवून त्यांना जेरबंद करावे अन्यथा शासनाकडून बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
स्वराज्य सुनिल भापकर (10, रा.भापकरवाडी ता.श्रीगोंदा जि.नगर) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. स्वराज्य हा किन्ही येथे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त त्याच्या आजी मिरणबाई लालाभाऊ काकडे हिच्याकडे आला होता.किन्ही गावापासून अर्धा कि.मी.अंतरावर खंडोबा मळा आहे. या ठिकाणी शुक्रवारी सकाळी स्वराज्यसह त्याचे काका कृष्णा हिंगे (मावशीचा नवरा) आजी,मावशी शेतात गेले होते. स्थानिकांच्या माहितीनुसार, कुटुंबिय गहू खुरपत होते तर काका जवळच विहिरीवर लाइट आली की नाही हे पाहण्यासाठी गेले होते त्यावेळी काकसोबत स्वराज्य देखील जात असताना तो मधेच बोरीच्या झाडाखाली बोरं वेचत असताना अचानक शेजारील तुरीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने स्वराज्यवर झडप घालत त्याला भक्ष्य केले. यावेळी त्याचे काका शेजारीच असलेल्या विहिरीवरचा विद्युत पंप सुरू करत होते. त्याच्या आवाजाने काका त्या दिशेने धावून गेले. पाहताक्षणी समोर त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या बिबट्याने शेपुट मारत स्वराज्यला तोंडात पकडून काही अंतरावरील एका झुडपात नेले. नंतर स्वराज्यच्या काकासह परिसरातील शेतकर्यांनी व वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी बिबटयाचा शोध सुरू केला. त्यावेळी बिबट्या झुडपात बसून स्वराज्यचे लचके तोडत होता.त्यावेळी वनविभागाच्या कर्मचार्यांनी त्यास काठ्या मारून हुसकून लावले त्यावेळी बिबट्याने तेथून पळ काढला. याच परिसरात स्वराज्यचा मृतदेह आढळून आला. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे आष्टी तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. चार दिवसापूर्वी पंचायत समिती सदस्यपती नागनाथ गर्जे यांना बिबट्याने ठार मारल्याची घटना घडली होती. त्यानंतर आष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याने संपूर्ण तालुक्यात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.तालुक्यात मागील तीन महिन्यापासून अनेक ठिकाणी बिबट्या दिसत असल्याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली होती. परंतू सुरूडीच्या घटनेपर्यंत वनविभागाकडून कोणत्याही गावात बिबट्याला अटकाव करण्यासाठी पिंजरे बसवण्यात आले नव्हते.
नातेवाईकांचा आक्रोश
बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षाच्या स्वराज्यचा मृत्यू झाला. या घटनेने त्याच्या नातेवाईकांना प्रचंड धक्का बसला असून त्यांनी एकच आक्रोश केला. नातेवाईकांचा हा आक्रोश पाहून उपस्थित ग्रामस्थही गहिवरून गेले.
ड्रोन कॅमेर्याने बिबट्याचा शोध
सुरूडीच्या घटनेनंतर किन्ही येथे शुक्रवारी बिबटयाने एका मुलाची शिकार केली. त्यामुळे परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या घटनेनंतर वनविभागाचे पथक किन्ही गावात दाखल झाले.वनविभागाच्या पथकाने ड्रोन कॅमेर्याच्या माध्यमातून गाव परिसरात बिबट्याचा शोध सुरू केला आहे.तसेच पिंजरा बसविण्यात आला आहे. दरम्यान वनविभागाने तात्काळ या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बुधवारी झाली माय लेकराची शेवटची भेट
स्वराज्य दिवाळीनिमित्त आजी कडे किन्ही या गावी आला होता सध्या शाळा बंद असल्याने तो सुट्टीनिमित्त किन्ही मध्ये पंधरा दिवसापासून राहत होता.बुधवार दिनांक 25 रोजी स्वराज ची आई शितल ही किन्ही मध्ये आईकडे आली त्यावेळी स्वराज ला गावाकडे (श्रीगोंदा) चल म्हणाली होती मात्र सध्या सुट्टी आहेत शाळा सुरू झाल्यानंतर येईल असे स्वराज आई शितल ला म्हणाला होता. बुधवारची ही शेवटची मायलेकरांची भेट झाली होती.स्वराजला बिबट्याने उचलून नेल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ त्याचा शोध घेत असताना तुरीच्या झाडा शेजारी एका झुडपात त्याच्या मृतदेहाचे लचके तोडत होता. त्यादरम्यान वनविभागाचे कर्मचारी बबन गुंजाळ यांनी त्या बिबट्यावर काठीने जोराचा फटका मारला परंतु झाडाच्या फांदीमुळे त्याला मार लागला नाही व बिबट्या चतुराईने तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरला.
वनविभागाचे शंभर कर्मचारी किन्हीमध्ये
शुक्रवारी दुपारी बिबट्याने दहा वर्षीय मुलाला उचलून नेल्यानंतर तातडीने वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी गावात तळ ठोकून बिबट्याचा शोध घेत आहेत यामध्ये मधुकर तेलंग आष्टीचे वन अधिकारी श्याम शिरसाट यांच्यासह अमरावती औरंगाबाद व नाशिक येथून आलेले जवळपास शंभर कर्मचारी बिबट्याचा शोध घेत असून बिबट्याला त्वरित बंदिस्त करू असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला.
वनमंत्र्यांनी लक्ष घालावे-आ.धस
आष्टी तालुक्यामध्ये गेल्या तीन दिवसात बिबट्याने दोन जणांची शिकार केली आहे या प्रकरणी राज्याचे वनमंत्री यांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे अमरावती वरून पाठवलेले पिंजरे त्वरित या ठिकाणी बसवण्यात यावेत सदरील बिबट्या हा पूर्णपणे नरभक्षक झालेला असून तो प्रचंड चिडलेला आहे या बिबट्याला जर वेळीच जेरबंद केले नाही तर तो आणखी काही लोकांचा जीव घेऊ शकतो चाळीसगाव प्रमाणे दुर्घटना टाळण्यासाठी या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी आ.सुरेश धस यांनी केली आहे.
दुर्दैवी घटना-दत्ता काकडे
किन्हीमध्ये दहा वर्षेच्या मुलाला बिबट्याने ठार केल्याची अतिशय दुर्दैवी घटना असून एकीकडे तलाव तर दुसरीकडे उंच पिके आहेत त्यामुळे या गावावर बिबट्याची पूर्णपणे दहशत झालेली आहे दुसर्या दुर्घटना टाळण्यासाठी वन विभागाने त्वरित बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी केली आहे.
आजोळी आला मृत्यू
स्वराज भापकर हा श्रीगोंदा तालुक्यातील भापकरवाडी येथील रहिवासी असून, तो आजोळी काकडेची किन्ही येथे दिवाळीनिमित्त आलेला होता. स्वराजचे वडील शेतकरी आहेत. आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. मावशीच्या पतीबरोबर (काका) तो शेतात आला होता. मोटार चालू करताना अचानक तुरीच्या पिकातून झेप घेत बिबट्याने त्याला काकासमोर उचलून नेले.
Leave a comment