किन्हीच्या घटनेनंतर पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली चिंता
बीड । वार्ताहर
बीड जिल्हयातील बिबटयाच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटनांवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी चिंता व्यक्त केली असून राज्य सरकारने हे हल्ले गांभीर्यपूर्वक घ्यावेत आणि ड्रोन व नाईट व्हिजन कॅमेर्याद्वारे बिबटयाचा शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी मुख्यमंत्री व वनमंत्र्यांना आज पुन्हा पत्र पाठवून केली आहे.
बिबटयाने केलेल्या हल्ल्यात आष्टी तालुक्यातील नागनाथ गर्जे या शेतकर्याला आपला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतांना आज किन्ही येथे बिबटयाने पुन्हा एकदा मानवी वस्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात स्वराज भापकर (वय 9) हा मुलगा ठार झाला, या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे व भितीचे वातावरण पसरले आहे.मागील एक महिन्याच्या कालावधीत पाथर्डी, अहमदनगर, बीड या भागात साधारणपणे 13 ते14 ठिकाणी नरभक्षक बिबटयाने मानवी वस्तीत हल्ले केले असून त्यात साधारणपणे 8 (आठ) जणांचा मृत्यु झाला आहे. यासंदर्भात पंकजाताई मुंडे यांनी 24 नोव्हेंबर रोजी सविस्तर पत्र पाठविले होते. आज किन्हीच्या घटनेनंतर त्यांनी पुन्हा सरकारला पत्र दिले आहे.बिबटयाचे हल्ले रोखण्यासाठी अनुभवी नेमबाजांची नियुक्ती करावी, मोठया प्रमाणावर पिंजरे लावावेत व दिवसभर 7 ते8 ड्रोन कॅमेर्याव्दारे तसेच नाईट व्हिजन कॅमेर्याव्दारे बिबटयाचा शोध घ्यावा यासह काही उपायोजना तात्काळ प्रभावीपणे राबविण्यात याव्यात अशी मागणीही पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.
Leave a comment