आष्टी तालुक्यातील किन्ही शिवारातील घटना
परिसरात बिबट्याची दहशत; ग्रामस्थ भयभीत
आष्टी: तालुक्यातील सुरडी येथील पंचायत समिती सदस्य पतीची बिबट्याने शिकार केल्याची घटना ताजी असतानाच याच तालुक्यातील किन्ही या गावात शेतवस्तीवर मामाकडे सुट्टीनिमित्त आलेल्या एका नऊ वर्षीय मुलाची बिबट्याने शिकार केली. ही खळबळजनक घटना आज शुक्रवारी (दि.27) दुपारी 12 वाजेच्या सुमारास समोर आली. यामुळे किन्ही गावासह परिसरातील गावांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. वनविभागाने तातडीने या नरभक्षक बिबट्यांचा शोध घेवून त्यांना जेरबंद करावे अन्यथा शासनाकडून बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
स्वराज्य सुनिल भापकर (9, रा.श्रीगोंदा, ता.जि.नगर) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. स्वराज्य हा किन्ही येथे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त त्याच्या मामाकडे आला होता.किन्ही गावापासून अर्धा कि.मी.अंतरावर खंडोबा मळा आहे. या ठिकाणी शुक्रवारी सकाळी स्वराज्यसह त्याचे मामा व मामाचे कुटुंबिय शेतात आले होते. स्थानिकांच्या माहितीनुसार, कुटुंबिय गहू खुरपत होते तर तुरीच्या शेंगा खाण्यासाठी स्वराज्य हा बाजुच्याच शेतात गेला होता. यावेळी त्याचे मामा शेजारीच असलेल्या विहिरीवरचा विद्युत पंप सुरू करत होते. याचवेळी तुरीच्या शेतात लपलेल्या बिबट्याने स्वराज्यवर झडप घातली. त्याच्या आवाजाने मामा त्या दिशेने धावून गेले.
पाहताक्षणी समोर त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या बिबट्याने शेपुट मारत स्वराज्यला तोंडात पकडून अर्धा कि.मी.अंतरावरील एका झुडपात नेले. नंतर स्वराज्यच्या मामासह परिसरातील शेतकर्यांनी बिबटयाचा शोध सुरू केला. आवाजाने बिबट्याने झुडपातून पळ काढला. याच परिसरात स्वराज्यचा मृतदेह आढळून आला. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर आष्टी तालुका वनाधिकारी शाम सिरसाट हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. आष्टी पोलिसांचा फौजफाटाही किन्ही गावात पोहोचला. या प्रकारामुळे आष्टी तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. चार दिवसापूर्वी पंचायत समिती सदस्यपती नागनाथ गर्जे यांना बिबट्याने ठार मारल्याची घटना घडली होती. त्यानंतर आष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याने संपूर्ण तालुक्यात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात मागील तीन महिन्यापासून बिबट्या दिसत असल्याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली होती. परंतू सुरूडीच्या घटनेपर्यंत वनविभागाकडून कोणत्याही गावात बिबट्याला अटकाव करण्यासाठी पिंजरे बसवण्यात आले नव्हते. याच दरम्यान पैठण तालुक्यातील आपेगाव परिसरात बिबट्याने बाप-लेकावर हल्ला केला होता. त्यानंतर सुरूडीच्या घटना घडली अन् आता शुक्रवारी दुपारी किन्ही येथील खंडोबा मळा परिसरात एका मुलाला बिबट्याने ठार मारले. वनविभागाने नरभक्षक बिबटयांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आष्टी तालुक्यातील किन्ही या गावची घटना ताजी असतानाच याच गावापासून दोन कि.मी.अंतरावरील कोहिनी या गावामध्ये बिबटयाने एका महिलेवर हल्ला केल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होवू लागली परंतू या बाबत अधिकृत माहिती वन विभागाकडून समोर आलेली नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तातडीने वनविभागाला माहिती द्यावी अशी आवाहन करण्यात आले आहे.
नातेवाईकांचा आक्रोश
बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षाच्या स्वराज्यचा मृत्यू झाला. या घटनेने त्याच्या नातेवाईकांना प्रचंड धक्का बसला असून त्यांनी एकच आक्रोश केला. नातेवाईकांचा हा आक्रोश पाहून उपस्थित ग्रामस्थही गहिवरून गेले.
ड्रोन कॅमेर्याने बिबटयाचा शोध
सुरूडीच्या घटनेनंतर किन्ही येथे शुक्रवारी बिबटयाने एका मुलाची शिकार केली. त्यामुळे परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या घटनेनंतर वनविभागाचे पथक किन्ही गावात दाखल झाले.वनविभागाच्या पथकाने ड्रोन कॅमेर्याच्या माध्यमातून गाव परिसरात बिबट्याचा शोध सुरू केला आहे. दरम्यान वनविभागाने तात्काळ या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ दत्ता काकडे व इतरांनी केली आहे.
Leave a comment