सहकार क्षेत्रातील उमदं नेतृत्व पडद्याआड 

छत्रपती राजर्षी शाहू बँकेचे संस्थापक अध्यक्ष 

बीड । वार्ताहर

मराठवाड्यातील बँकिंग क्षेत्रात अग्रणी असलेल्या छत्रपती राजर्षी शाहू नागरी बँकेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव जाहेर पाटील यांचे आज गुरुवारी (दि.26) पहाटे 1.30 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते 76 वर्षांचे होते.त्यांच्या निधनाची वार्ता कळताच अनेकांना धक्का बसला.
 सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अर्जुनराव जाहेर पाटील यांनी स्वकर्तुत्वाने उद्योग, बँकिंग, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून अभियंता पदवी प्राप्त केल्यानंतर शासकीय सेवेची संधी असतानाही त्यांनी स्वतंत्रपणे उद्योगी जीवनाचा प्रारंभ केला. 1968 मध्ये त्यांनी मराठवाडा उद्योग मंडळाच्या माध्यमातून उद्योगविश्वात उडी घेतली आणि अल्पावधीतच हा उद्योग नावारूपास आणला. जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून त्या माध्यमातून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुरुवात केली. औरंगाबाद येथील प्रख्यात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीवरही त्यांची निवड झाली होती. बीड येथील बलभीम महाविद्यालय आणि विधी महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष, मराठवाडा चेम्बरचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र चेंबरचे ते संचालक होते. उद्योग, बँकिंग क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी शेकडो बेरोजगार तरुणांचे त्यांनी भवितव्य घडविले.
मराठा महासंघाच्या कार्यातही त्यांनी लक्षणीय योगदान दिले.  राजर्षी शाहू बँक ही अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या जीवनकार्यातील मैलाचा दगड ठरली. त्यांच्या पुढाकारातून 1995 साली सुरु झालेल्या या बँकेच्या आज राज्यभरात 46 शाखा आहेत. अत्याधुनिकता, गुणवत्ता आणि अतिशय पारदर्शी व्यवहारासाठी ही बँक प्रसिद्ध आहे. मराठवाड्यातील सहकारी क्षेत्रातील बँकात शाहू बँकेने सर्वप्रथम एटीएमची सुरुवात केली होती. या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनचे कार्याध्यक्षपद भूषविले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन बीड रोटरी क्लब, व्यापारी महासंघ, जिल्हा उपनिबंधक सह. संस्था यासह महाराष्ट्रातील विविध शहरातून आणि विविध संस्थांच्या वतीने त्यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मागील काही महिन्यापासून ते कर्करोगाने आजारी होते. अखेर गुरुवारी पहाटे उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
उमदे व्यक्तिमत्व गमावले- जयदत्त क्षीरसागर
औद्योगिक क्षेत्राची प्रगती व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आणि तरुणांना उद्योजकांना योग्य मार्गदर्शन करून औद्योगिक क्षेत्रासाठी सक्रिय राहून बँकिंग क्षेत्रात विश्वास संपादन करणारे नेतृत्व म्हणून अर्जुनराव जाहेर पाटील होते बँकिंग क्षेत्रात व औद्योगिक क्षेत्रातील  तसेच शिक्षण क्षेत्रातील एक नेतृत्व गमावले असल्याची भावना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे. आज छत्रपती राजश्री शाहू अर्बन बँकेचे अध्यक्ष अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील 
व्यक्तिमत्त्व हरपले-पंकजाताई मुंडे
छत्रपती राजर्षि शाहू अर्बन बँकेचे अध्यक्ष अर्जूनराव जाहेर पाटील यांच्या निधनाने बीड जिल्हयाच्या सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील उमदे व्यक्तिमत्त्व हरपले आहे अशा शब्दात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.त्यांच्या निधनाने बीड जिल्हा एका उमद्या व्यक्तीमत्वाला मुकला आहे, त्यांच्या निधनाने कोसळलेल्या दुःखात मी व माझा परिवार सहभागी आहे, अशा शोकभावना व्यक्त करून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.