पावसामुळे जिल्ह्यात पाणीसाठा वाढला
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच पाऊसमान समाधानकारक राहिले आहे. पावसाने जोर कायम ठेवल्याने गोदावरी व कृष्णा खोर्यांतर्गचे जिल्ह्यातील सर्व 144 प्रकल्पापैकी तब्बल 74 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. वार्षिक सरासरीच्या तुलनेत (638.9 मि.मी) जिल्ह्यात 24 सप्टेंबरअखेरपर्यंत तब्बल 592.10 मि.मी. म्हणजेच 92.67 टक्के पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पीय पाणीसाठ्याची टक्केवारी 75.40 इतकी आहे. लाभक्षेत्र विकास प्राधीकरणनी ही माहिती दिली.
बीड जिल्ह्यात एकुण 144 प्रकल्प आहेत. यात माजलगाव व मांजरा हे 2 मोठे, तर बीड व परळी विभागातील 16 मध्यम आणि 126 लघु प्रकल्पांचा समावेश आहे. सद्यस्थितीत माजलगाव प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला आहे. या धरणात 97.59 टक्के पाणीसाठा झालेला असून धरणाचे 11 दरवाजे यापूर्वीच उघडण्यात येवून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. दुसरीकडे मांजरा प्रकल्पात केवळ 35.15 टक्के इतकाच पाणीसाठा आहे. गोदावरी खोर्यातंर्गतच्या बीड विभागातील 4 व परळी विभागातील 10 मध्यम प्रकल्पात मिळून 90.23 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपब्ध झाला आहे. याशिवाय कृष्णा खोर्यातंर्गतच्या 6 मध्यम प्रकल्पात 72.27 टक्के पाणीसाठा आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील 126 लघुप्रकल्पात मिळून 70.40 टक्के पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात गोदावरी खोर्यांतर्गचे 7 मध्यम व 53 लघु असे 60 प्रकल्प तर कृष्णा खोर्यातंर्गतचे 3 मध्यम व 11 लघु असे एकुण 74 प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरलेले आहेत तर जिल्ह्यातील माजलगाव या मोठ्या प्रकल्पासह गोदावरी खोर्यातंर्गतच्या 6 लघु व कृष्णा खोर्यातंर्गतच्या 1 मध्यम व 2 लघु अशा एकुण 10 प्रकल्पात 75 टक्के पेक्षा अधिक पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील 16 प्रकल्पांमध्ये 51 ते 75 टक्के तर 8 प्रकल्पांमध्ये 25 ते 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. 14 प्रकल्पाची पाणी क्षमता आजही 25 टक्क्यांपेक्षा कमी असून 17 प्रकल्पातील पाणीसाठा ज्योत्याखाली आहे. याशिवाय केवळ 5 प्रकल्प कोरडे आहेत.
Leave a comment