परळी-105, केज-17, अंबाजोगाई-46
माजलगाव-29 तर आष्टीत 33 रुग्ण
बीड । वार्ताहर
जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई, माजलगाव, परळी आणि आष्टी या पाच शहरात सर्व व्यापारी, व्यावसायिक, बँक, पेट्रोलपंप कर्मचारी, फळ,भाजीसह दूध विक्रेते आदींची मंगळवारपासून अॅन्टिजेन टेस्ट घेतली जात आहे. पहिल्या दिवशी या पाच शहरात एकुण 5769 टेस्ट घेण्यात आल्या. यात 212 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान बुधवारी (दि.19) दिवसभरात या पाच शहरात एकुण 6189 अॅन्टिजेन टेस्ट घेतल्या गेल्या. पैकी 230 नवे कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यात परळी शहरात सर्वाधिक 105 कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग कमी करण्यासाठी केज, अंबाजोगाई, माजलगाव ,आष्टी आणि परळी या 5 शहरातील सर्व प्रकारच्या दुकानदारांची कोरोनाच्या निश्चित निदानासाठी 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान अॅन्टिजेन टेस्ट घेण्यात येत आहे. यादरम्यान सर्व दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत. आज बुधवारी तपासणीच्या दुसर्या दिवशी या पाचही शहरात एकुण 230 नवे कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले. त्यांना उपचारासाठी कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
बुधवारी दिवसभरात केज शहरात 607 अॅन्टिजेन टेस्ट झाल्या. पैकी 17 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. अंबाजोगाई शहरात एकुण 2091 टेस्ट झाल्या. पैकी 46 अहवाल कोरोना बाधित आले.माजलगावमध्ये दिवसभरात 859 तपासण्या झाल्या. यातील 29 अहवाल पॉझिटिव्ह आले. आष्टी शहरातही 600 एकुण अॅन्टिजेन टेस्ट झाल्या. यात 33 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. परळी शहरात 2032 अॅन्टिजेन टेस्ट करण्यात आल्या. यातील 105 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान उद्या गुरुवारीही कोरोनासंबंधी अॅन्टिजेन टेस्ट केल्या जाणार आहेत.आरोग्य विभागाची टिम यासाठी परिश्रम घेत आहे.
आता 1483 रुग्णांवर उपचार
बीड जिल्ह्यात बुधवारपर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3202 इतकी झाली आहे. यातील 1641 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे तर आजपर्यंत 78 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 1483 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी 89 रुग्णांना डिस्चार्ज दिला जाणार आहे.
Leave a comment