यावर काय म्हणाले शरद पवार ; पवारांनी सांगितलं नेमकं कारण

औरंगाबाद

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार हे राज्यभर दौरा करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या शहरांना भेट देऊन शरद पवार तेथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शरद पवार यांना शुक्रवारी नाशिकचा दौरा केला होता. नंतर ते शनिवारी औरंगाबाद शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते.

कोरोनाचे सबंध महाराष्ट्रावर संकट आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यात जाऊन बसले तर बाकीच्या जिल्ह्यांच्या समस्यांवर तातडीने निर्णय घेता येणे अवघड होईल. आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव कॅप्टन (मुख्यमंत्री ठाकरे) एका ठिकाणी बसून सगळी टीम काम करते आहे की नाही, यावर नियंत्रण ठेवत आहेत. मला करमत नाही. मी सतत लोकांत राहणारा माणूस आहे, मला एका जागी बसवत नाही. म्हणून मी फिल्डवर जात असल्याचे सांगून शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची शनिवारी पत्रकार परिषदेत पाठराखण केली. 80 वयोमान असूनही राज्यातील विविध जिल्ह्यात जाऊन शरद पवार आढावा घेत आहेत पण मुख्यमंत्री काही बाहेर पडत नाही, या टीकेवर पवार यांनी भाष्य केले.

 

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनामुळे वाढलेला मृत्यूदर, प्रशासनाच्या उपाययोजना जाणून घेण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीला शरद पवार यांची विशेष उपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी बैठकीला होते.

भूकंप झाला होता तेव्हा त्या भागात मुख्यमंत्र्याचे कार्यालय हलवण्यापर्यंतची कार्यवाही शरद पवार यांनी केली होती. त्या संदर्भात विचारेल्या प्रश्नावर बोलाताना पवार म्हणाले, भूकंपाची आपत्ती तशी मर्यादित जिल्ह्यात आणि गावांमध्ये होती. त्यामुळे तेथे तसे करता आले. कोरोना ही समस्या संपूर्ण राज्यभर आहे. त्यामुळे राज्यातील सर्व माहिती मुख्यमंत्री स्वत: सकाळपासून संध्याकाळपर्यंत घेतात. तातडीने राज्याचे निर्णय घेण्यासाठी कॅप्टनने चमू नीट काम करतो आहे का हे पाहायचे असते. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. पालकमंत्र्यासह येथील नेते आवश्यकत त्या बाबी त्यांच्या कानावर घालत आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आवश्यक त्या बाबी कानावर टाकू, असं म्हणत मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीची शरद पवार यांनी पाठराखण केली.

 

पुढे ते म्हणाले की, मला अनेक संकटात अनेकांनी मदत केली आहे. त्यामुळे संकटाच्या काळात आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली पाहिजे, त्यांच्याशी बोलले पाहिजे. या कर्तव्य भावनेतून आपण दौरा करत आहोत. त्यामागे अन्य कोणताही उद्देश नाही. प्रश्न विचारताना वयाच्या उल्लेखावरुन त्यांनी मिश्किल टिप्पणीही केली. माझे वय 80 असताना तुम्ही ते 85 कशासाठी करता त्यावर माझा आक्षेप आहे, असे म्हणत शरद पवारांनी पत्रकार परिषदेचे वातावरण हलके राहील, असेही पाहिले.

आपत्ती व्यवस्थापन कायद्याांतर्गत खासगी डॉक्टरांना कामावर बोलावण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. अद्याप तशी वेळ आली नसल्याचे सांगत असे करता येईल, असेही त्यांनी सूचित केले. औरंगाबादमध्ये अल्पसंख्याक समाजाने सहकार्य केल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला. दोन दिवसापासून बकरी ईदसाठी सामुहिक नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. त्यांच्याकडे पाहून या पुढेही कोरोना काळात सहकार्य मिळेल, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली येथील कोरोनाची स्थिती काळजी करण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातही मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिली, नाशिक औरंगाबाद या शहराची स्थिती काळजी करण्यासारखी आहे. ऑगस्टमध्ये कदाचित करोनाची मोठी लाट आली तर खाटांची कमतरता भासू शकेल. त्यामुळे औरंगाबादमध्ये खाटा वाढवण्यासाठी काम करावे लागेल, अशी सूचना त्यांनी यावेळी प्रशासनास केली. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याांतर्गत खासगी डॉक्टरांना समन्स बजावून कामावर बोलावता येण्याची तरतूद आहे. अद्यााप तशी वेळ आली नाही. मात्र अशी तरतूद वापरता येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडये तसेच घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कानन येळीकर यांनी कोरोना संदर्भातील माहिती पालकमंत्री सुभाष देसाई व लोकप्रतिनिधीसमोर दिली. केंद्र सरकारकडे करोनाकाळात कोणती मागणी नोंदवायची याचा साधारण अंदाज यावा म्हणून दौरा करत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

चिंताजनक परिस्थिती...

औरंगाबादमध्येही कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. आवश्यक ती उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. तसेच कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बेड्सची संख्या वाढवण्याची गरज असल्याचंही पवार म्हणाले. शहर आणि ग्रामीण या दोन्हीही ठिकाणी लोकांची सहकार्याची भूमिका आहे. आपण लवकरच संकटावर मात करु, असा विश्वास देखील पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात एकही दौरा केला ही. ते एका ठिकाणी बसूनच राज्यातील कामकाज पाहत आहेत. यावर विरोधकांकडून कडाडून टीका होत आहे. मी महाराष्ट्रभर फिरतोय, मुख्यमंत्री एकाच ठिकाणी बसून आहेत, या मागील कारण सांगून शरद पवार यांनी विरोधकांची बोलती बंद केली.

लातूरात भूकंप आला होता तेव्हा पवारांनी मुख्यमंत्री कार्यालय लातूरात हलवलं होतं. परंतु मुख्यमंत्री कुठेही जात नाही, असा सवाल विरोधक करत आहेत. यावर शरद पवार यांनी सांगितलं की, लातूरचा भूकंप होता, तर तो एका जिल्ह्याचा भाग होता. आताचं संकट हे संपूर्ण राज्यातील आहे. यामुळे मुख्यमंत्री एकाच भागात जाऊन बसले तर, निर्णय प्रक्रियेत अडचणी निर्माण होतील. यामुळे कॅप्टनने मुख्य ठिकाणी बसून सर्वांवर लक्ष ठेवावे, जी कमतरता असेल ती सांगावी, असा आमचा आग्रह आहे. आता पालकमंत्री इथून गेले तर ते मुख्यमंत्री आणि त्यांच्या संबंधीत गोष्टींशी चर्चा करतील. ही कमतरता आहे ती पूर्ण करा, मी देखील मुख्यमंत्र्यांना भेटून कमतरतांविषयी सांगेल. यामुळे त्यांनी एका ठिकाणी बसून लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचं शरद पवार म्हणाले.

राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणे महत्त्वाचं आहं. यासाठी मी दौरे करतोय, मला करमत नाही, मला एका जागेवर बसवत नाही. मी सतत लोकांमध्ये फिरणारा माणूस आहे. मला लोकांशी बोलत राहण्याची सवय आहे. यामुळे मी फिरत असतो. जिथे संकट आलं तिथे मी जातो. चौकशी करणं, मदत करणं, या भावनेतून मी फिरतोय, असं शरद पवारांनी सांगितलं.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.