बारावीचा जिल्ह्याचा निकाल 88.83 टक्के
जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलीच हुश्शार
एकुण 38 हजार 886 पैकी 34 हजार 544 विद्यार्थी झाले पास
बीड । वार्ताहर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेतल्या जाणार्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.15) दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आला. या निकालात बीड जिल्ह्याने औरंगाबाद विभागात दुसरे स्थान मिळवले आहे. बीड जिल्ह्याचा एकुण निकाल 88.83 टक्के इतका लागला असून तो औरंगाबाद विभागात दुसर्यास्थानी आहे. विभागात सर्वाधिक निकाल जालना जिल्ह्याचा (90.72 टक्के) लागला आहे.
फेबु्रवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत बीड जिल्ह्यातून एकुण 39 हजार 156 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी 38 हजार 886 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात 24 हजार 268 मुले तर 14 हजार 618 मुलींची समावेश आहे. दरम्यान गुरुवारी निकाल जाहीर झाल्यानंतर एकुण 34 हजार 544 विद्यार्थी उर्त्तीण झाले आहेत. यामध्ये 21 हजार 148 मुले तर 13 हजार 396 मुलींचा समावेश आहे.
दरम्यान मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 87.14 टक्के तर मुलींच्या उर्त्तीर्णतेचे प्रमाण तब्बल 91.64 इतके असल्याने बीड जिल्ह्यात यंदा मुलांच्या तुलनेत मुलीच हुश्शार असल्याचे हाती आलेल्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे. बीड जिल्ह्याचा एकुण निकाल 88.83 टक्के इतका लागला आहे. औरंगाबाद विभागात हा निकाल दुसर्यास्थानी आहे. जालना जिल्हा सर्वाधिक 90.92 टक्के घेवून विभागात प्रथम आला आहे तर हिंगोली जिल्हा तृतीय ठरला आहे. हिंगोलीचा निकाल 88.54 टक्के तर मराठवाड्याच्या शिक्षणाचे माहेरघर असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल (87.76 टक्के) चौथ्यास्थानी आहे तर परभणी जिल्ह्याचा सर्वात कमी 84.66 टक्के इतका निकाल लागला आहे.
जिल्ह्यात केज तालुका ठरला अव्वल
यंदा बारावीच्या परीक्षेत बीड जिल्ह्यात केज तालुक्याचा सर्वाधिक 93.54 टक्के निकाल लागला आहे. या तालुक्यातून 3224 मुले व 1608 मुलीं अशा एकुण 4832 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.पैकी एकुण 4520 विद्यार्थी उर्त्तीण झाले आहेत. मुलांच्या उर्त्तीणतेचे प्रमाण 93.39 टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे हेच प्रमाण 93.84 टक्के इतके आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत केज तालुक्याचा निकाल सर्वाधिक राहिला आहे.
विज्ञान शाखेचा सर्वाधिक 94.99 टक्के निकाल
बारावीच्या परीक्षेत शाखानिहाय अभ्यासक्रमात दरवर्षीप्रमाणे यंदाही विज्ञान शाखेचा सर्वाधिक 94.99 टक्के इतका निकाल लागला आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या एकुण 38 हजार 886 विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक 19 हजार 274 विद्यार्थ्यांनी गतवर्षी विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेत बारावीची परीक्षा दिली. यापैकी तब्बल 18 हजार 309 विद्यार्थी विज्ञान शाखेतून उर्त्तीण झाले आहेत. याशिवाय जिल्ह्याचा वाणिज्य शाखेचा निकाल 92.72 टक्के लागला आहे तर कला शाखेचा निकाल 81.37 टक्के आला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा 80.45 टक्के इतका निकाल लागला आहे.
Leave a comment