बीड। वार्ताहर
परळी व तालुक्यातील बहुतांश व्यक्तींचे स्वॅब अहवाल अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत प्रलंबित असल्याने परळी शहरात यापूर्वी घोषीत केलेले लॉकडाऊन आणखी दोन दिवस वाढवण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी रात्री त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
परळी येथील एसबीआयमधील कर्मचार्यांना कोेरोनाची लागण झाल्याने आणि त्यांच्या संपर्कात परळीसह परिसरातील अनेक गावचे ग्राहक आल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाने संपूर्ण परळी शहर लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. दरम्यान मागील दोन दिवसांपासून परळी तालुक्यातून सर्वाधिक स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत. मात्र यातील बहुतांश स्वॅब तपासणीचे अहवाल प्रयोगशाळेत प्रलंबित असल्याने आता परळी शहरातील लॉकडाऊन आणखी दोन दिवस वाढवण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज रविवारी दिली आहे. त्यामुळे परळीत यापूर्वी घोषीत केलेला लॉकडाऊन आणखी दोन दिवस वाढला आहे.
Leave a comment