मुंबई । वार्ताहर
चीनमधून सुरू झालेलं कोरोना व्हायरस नावाचं संकट जगाच्या कानाकोपऱ्यात धडकलं. भारतातही कोरोनाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक टप्प्यांच्या लॉकडाऊननंतरही भारतातील कोरोनाची साखळी तोडण्यात यश आलेलं नाही. अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईबाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
कोरोनाबाधितांच्या संख्येत आता मुंबईने चीनलाही मागे टाकल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या 85 हजार 320 इतकी आहे, तर मुंबईत ही संख्या आता 85 हजार 724 वर पोहोचली आहे. तर चीनमध्ये 4 हजार 648 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला असून मुंबईमध्ये ही संख्या 4938 इतकी आहे.
काही दिवसांपूर्वी चीनने कोरोनामुक्त होण्याचा दावा केला होता. चीनमध्ये आता अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. चीनमध्ये केवळ 500 ते 600 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र त्याचवेळी मुंबईत मात्र 23 हजार 624 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ज्या चीनमुळे कोरोनाचा शिरकाव जगभरात झाला, त्या चीनपेक्षाही एकट्या मुंबई शहरात अधिक रुग्ण आढळले असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचं संकट दूर करण्यासाठी प्रशासनाला आणखी मेहनत घ्यावी लागेल, असं दिसत आहे.
Leave a comment