महाविकासआघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर
मुंबई :
विश्वासात न घेता लॉकडाऊन वाढवल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं समोर येतं आहे. मिशन बिगीन अगेनची घोषणा करून पुन्हा लॉकडाऊन कायम ठेवल्याबाबत महाविकास आघाडीतल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. निर्णय घेण्याआधी मंत्र्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचं काही मंत्र्यांचं मत आहे.
महाविकासआघाडीचे नेते शरद पवार यांच्याकडे याबाबत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. आज सकाळी शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत चर्चा देखील केली. नाराजी दूर करण्यासाठी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात उद्या भेट होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने राज्यात पुन्हा तेच नियम कायम ठेवत मिशन बीगीन अगेनच्या दुसरा टप्पा लागू केला. पण हा निर्णय घेतांना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नसल्याचं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं म्हणणं आहे.
याआधी काँग्रेस नाराज होती. निर्णय प्रक्रियेत सहभाग नसल्याचं कारण देत त्यांनी नाराजी व्यक्त केली होता. त्यामुळे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. महाविकास आघाडीच्या सरकारला आता 7 महिने झाले आहेत. पण यादरम्यान अनेकदा नाराजी समोर आली आहे.
भाजपमध्ये फेरबदलाचे चंद्रकांत पाटलांचे संकेत
एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या भाजपमध्ये साईडलाईन झालेल्या नेत्यांना पक्षात नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसे संकेत दिले आहेत. उद्या भाजपची राज्य कार्यकारिणी जाहीर होणार आहे. यामध्ये या नेत्यांबाबत घोषणा होऊ शकते, असं मानलं जातंय.
चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षात प्रदेशाध्यक्षांनंतरचं महत्त्वाचं मानलं जाणाऱ्या प्रदेश सरचिटणीस पद दिलं जाऊ शकतं. पण खडसे, तावडे आणि पंकजा मुंडे यांच्याबद्दलचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
Leave a comment