मुंबई । वार्ताहर
कोरोनाग्रस्त झाल्यानंतर मुंबई येथे लिलावती रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालो त्यावेळी मला पंकजाताईंचा एक वेळा नव्हे तर चार ते पाच वेळा मला फोन आला आणि त्यांनी माझ्या प्रकृतीची चौकशी करत मला धीर दिला. गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय भूमिकेमुळे संवाद हरवला होता, मात्र दु:खाच्या काळात त्यांचा फोन आल्याने माझेही आत्मधैर्य वाढले अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
बालपणापासूनच सातत्याने कामात व्यस्त राहणे हा आपला स्वभाव असल्याने रूग्णालयात असताना कार्य अहवाल पुर्ण केला तर त्यानंतर क्वारंटाईनचा काळ संपल्यानंतर थेट कामालाच लागलो. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर मानसिक दृष्ट्या माणूस खचतो परंतू त्याच्याशी लढाई केली तर माणूस जिकंतो हे या आजारातून मी शिकलो असे त्यांनी यावेळी सांगितले. पंकजाताईंच्या फोनबद्दल बोलताना ते म्हणाले की आमच्या बहिण-भावामध्ये राजकीय संघर्ष झाला, एकाच कुटूंबात दोन राजकीय विचारधारा आल्या. त्यामुळे संवाद कुठेतरी हरवला होता, सुख-दु:खामध्ये आम्ही एकत्र येतोत मात्र संवाद होत नाही. या संकटामध्ये पंकजाताईंचा फोन आल्याने मनाला आनंद वाटला अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
Leave a comment