पुणे । वार्ताहर
सन 2019 विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना सत्ता बनवायला तयार नसताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट सिग्नल होता. दोन बैठका झाल्या होत्या. त्यातील एका बैठकीला मी होतो एकाला नाही. त्या बैठकीनंतरच दोघांनी मिळून पुढे जायचं ठरलं होतं. भाजप सोबत जायचं हा निर्णय काही एकट्या अजित पवारांनी घेतला नाही. हा निर्णय हा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा होता असा खुलासा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
ज्येष्ठ पत्रकार राजू परूळेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक स्फोटक खुलासे केले आहेत. फडणवीस यांनी नाव न घेता सरळ शरद पवारांच्या सांगण्यानंतरच अजित पवार भाजपला मिळाले असं थेटपणे सूचित केलं. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजुने असता तर माझं आणि अजित पवारांचे सरकार 100 टक्के टिकले असते असे मतही त्यांनी व्यक्त केले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार दोनच वर्षांपूर्वी बनले असते. पण काही गोष्टी जुळून येऊ शकल्या नाहीत असंही ते म्हणाले.
सत्तेत असताना उद्धव ठाकरेंची एकही गोष्ट अव्हेरली नाही. त्यामुळे त्यांच्या वागण्याचा सात्विक संताप आला असेही ते म्हणाले. राज ठाकरे यांच्यासोबत व्यक्तिगत मैत्री आहे. त्यांचा मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा आम्हाला मान्य आहे. मात्र परप्रांतियांबाबतची त्यांची टोकाची भूमिका मान्य नाही. भाजप आणि मनसे एकत्र येऊ शकतात का? या प्रश्नावर मात्र त्यांनी थेट उत्तर दिलं नाही. त्यांनी टोकाची भूमिका सोडली तर वगळं घडू शकते. मात्र हा प्रश्न राज ठाकरे यांनाच विचारा असंही फडणवीस म्हणाले.सत्ता गेल्यानंतर दोन दिवस आपली सत्ता गेली हे पटतच नव्हते. मात्र ती जाणीव व्हायला जास्त वेळ गेला नाही असेही ते म्हणाले.
जेव्हा कुणाला माहिती नव्हतं तेव्हा मुख्यमंत्री झालो
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यावेळी मुख्यमंत्री झालो, साधारण मला कल्पना होती. मी कधीही बाहेर बोललो नाही. केंद्रीय नेतृत्वानं ती दिली होती. आनंद होता. पण दुसर्या कानाला कळू द्यायचं नाही. आमच्याकडे तशी पद्धत आहे. त्यामुळे माझा आनंद बाहेर दिसला नाही. बातमी कळल्यानंतर जो आनंद होतो, ती परिस्थिती कधी आली नाही. त्याबद्दल मी पत्नी व आईलाही सांगितलं नव्हतं. त्यावेळी कुणालाही वाटलं नव्हतं मी मुख्यमंत्री होईल, तेव्हा मुख्यमंत्री झालो. जेव्हा माझ्यासहित सगळ्यांना माहिती होतं की मी मुख्यमंत्री होणार आहे, त्यावेळस मी झालो नाही. त्याच दुःख निश्चितच झालं.
Leave a comment