बीड । वार्ताहर
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सर्व वैद्यकीय शाखेच्या परिक्षा 5 जून 2020 रोजी घेण्याचे निश्चित केले व त्या अनुषंगाने विद्यार्थी आणि महाविद्यालयांना सूचना पण जाहीर केल्या. पण काही विद्यार्थी संघटनांनी विरोधाचा सूर सुरू केला होता.
या अनुषंगाने परीक्षा बद्दल विद्यापीठाचे अधिष्ठाता यांनी आज पत्रक काढून माहिती दिली. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणार्या परीक्षा या मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारच घेण्यात येतील. तसेच सध्याची कोविङ -19 रोगाची परिस्थिती लक्षात घेता अंतिम मुदत वाढीसंदर्भात संदर्भात दिल्ली येथील मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडे विद्यापीठामार्फत विनंती करण्यात आली आहे. याबाबत एम.सी.आय. सकारात्मक असून लवकरच मुदतवाढीसंदर्भात निर्णय जाहिर होण्याची शक्यता आहे. कौन्सिलच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कोणतेही उल्लंघन केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, ज्यामध्ये त्यांची पदवी मान्यताप्राप्त न होणे असे होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून परिषदेच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल. याबाबत सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती व परीक्षेसाठी पुरेसा अवधी दिला जाईल. दिनांक 02 जून 2020 रोजी प्रसिध्द केलेल्या पत्रकानुसार दंत विद्याशाखेचे पदवी आणि पदव्युत्तर पदवी परीक्षाबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षांच्या संदर्भात दंत परिषदेने केलेल्या तरतुदींचा भंग न करता आणि परीक्षेचा एकसमान दर्जा राखण्यात यावा याकरीता पदवी आणि पदव्युत्तर या दोन्हीसाठी त्यांची परीक्षा काटेकोरपणे घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत . स्थानिक प्रशासनामार्फत तसेच राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या कोविड -19 रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून वेळोवेळी देण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे महाविद्यालयांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे याबाबत आणखी काही अडचण निर्माण झाल्यास प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बाहय परिक्षक व्हिडिओ कॉन्फरन्सिगब्दारे उपलब्ध राहण्याच्या पर्यायाबाबत परिस्थितीनुसार विचार करण्यात येईल. तसेच दंत विद्याशाखेच्या पदव्युत्तर पदवी परीक्षा प्रक्रिया जुलै 2020 पर्यंत पूर्ण करण्याबाबत दंत परिषदेने कळविले आहे. कोरोनाची सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे निरनिराळ्या आरोग्य अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येतील की नाही याबद्दल सतत विचारणा करण्यात येत असले तरी सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन यांनी दिलेल्या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शक सूचनांनुसार परीक्षा हे घेणे अनिवार्य असून विद्यापीठामार्फत देण्यात आलेल्या सर्व सूचना आणि कायदेशीर तरतूदीनुसार परीक्षांचे आयोजन करणेसंदर्भात कळविण्यात आले आहे. केंद्रीय परिषदेने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठाकडून परीक्षा घेतल्या जातील. या परीक्षेस सर्व विद्यार्थ्यांनी कोविङ -19 रोगाचा प्रादुर्भाव कमी करणेसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करुन परीक्षेस उपस्थित राहावे असे सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन यांनी कळविले आहे. वरील सुचनाच्या अनुषंगाने सर्व महाविद्यालयांनी योग्य ती तयारी पूर्ण करावी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबींबद्दल योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सूचित केले आहे.
Leave a comment