बीड । वार्ताहर
निकृष्ट आणि बोगस खताचा साठा करुन नंतर त्याची विक्री केल्याचे प्रकरण बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथे समोर आले आहे. या प्रकरणी खत विक्रेत्यासह चिखली (जि.पालघर) येथील भारत अॅग्रो फर्ट अॅन्ड रियालिटी लिमिटेट या कंपनीविरुध्द बीड ग्रामीण ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड पंचायत समितीचे कृषि अधिकारी भुजंग खेडकर यांनी याबाबत ग्रामीण ठाण्यात मंगळवारी फिर्याद नोंदवली. नवगण राजुरी येथील शिवकृपा अॅग्रो एजन्सीचा मालक सखाराम ज्ञानोबा जानवळे (रा.नवगण राजुरी) याने दि.17 मे रोजी त्याच्या रासायनिक खताच्या दुकानात निकृष्ट आणि बोगस बियाणाचा साठा करुन विक्रीसाठी ठेवला होता. कृषि विभागाने हा साठा जप्त करुन इतरत्र हलवू नये म्हणून आदेशीत केले होते. दरम्यान असे असतानाही संबंधित विक्रेत्याने खताची विक्री करुन शेतकर्यांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मंगळवारी (दि.16) खत विक्रेत्यासह चिखली (जि.पालघर) येथील भारत अॅग्रो फर्ट अॅन्ड रियालिटी लिमिटेट या कंपनीविरुध्द बीड ग्रामीण ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक राजपुत हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Leave a comment