एका अग्रलेखावरुन सेना-काँग्रेसमध्ये धुसफूस 

 

मुंबई । वार्ताहर

शिवेसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये प्रकाशित झालेल्या ‘खाट का कुरकुरतेय?’ या एका अग्रलेखामुळे सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची मने दुखावली गेली आहेत, अन् त्यांनी माध्यमांजवळ मोकळी करत शिवसेना नेतृत्वाची भेट घेवूनच चर्चा करणार असल्याचेही म्हटले आहे. एक मात्र नक्की, शिवसेनेचे ज्याअर्थी हा अग्रलेख लिहिल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि राज्यसरकारमधील मंत्री आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याअर्थी काँग्रेसला सत्तेत वाटा देताना डावलले जात आहे. त्यामुळेच आता आज महसुलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक थोरात हे दोघेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भेट घेणार आहेत. 

‘खाटेचे कुरकुरणे समजून घ्या’ अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘सामना’च्या अग्रलेखाला उत्तर दिले आहे. सामनाचा अग्रलेख हा अपूर्ण माहितीवर आधारित असून आम्ही म्हणणे मांडल्यावर त्यांनी पुन्हा एकदा अग्रलेख लिहावा, अशी मागणी करतानाच  संख्याबळानुसार मंत्रिमंडळ वाटप झाले,त्यात वाद नाही, मात्र राज्याच्या मुद्यांवर आम्हाला भेटायचे आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमचं म्हणणं समजून घ्याव अशा शब्दात शिवसेनेला उत्तर दिले आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षात धुसफूस सुरु झाल्याचे दिसत आहे. 

बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, 56-54-44 याप्रमाणे मंत्रिमंडळ वाटप झालं आहे. हा काही वादाचा विषय नाही. मात्र राज्याच्या हितासाठी काही मुद्दे मांडायचे आहेत.आम्ही भक्कमपणे महाविकास आघाडीत आहोत. परंतु व्यथा असली तर सांगितली पाहिजे असं बाळासाहेब थोरात म्हणाले. मुख्यमंत्री काँग्रेसच्या नेत्यांना भेटत नाहीत, हे चुकीचं आहे. एक दोन दिवसात भेटीची वेळ मिळेल.आम्हाला मुख्यमंत्र्यांना समोरासमोर भेटायचं आहे. आमचे प्रश्‍न हे जनतेशी निगडित आहेत, अशी माहिती थोरात यांनी दिली.

सामनाच्या अग्रलेखात काय?  

काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा त्यांना अनुभव आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते आणि सत्ता कोणाला नको, असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रीपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये अशा शब्दात काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर भाष्य करण्यात आले आहे, तर भाजपला अप्रत्यक्ष इशारा देण्यात आला आहे.काँग्रेस पक्षाचेही बरे सुरु आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठेवली पाहिजे असेही अग्रलेखात म्हटले आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे कुरकुरणे तसे संयमी असते. घरात भावाभावांची भांडणे होतात. इथे तर तीन पक्षांचे सरकार आहे. थोडेफार कुरकुरणे होणारच. मुख्यमंत्र्यांना भेटून काय ते बोलू असे थोरातांनी सांगितले. त्याच खाटेवर बसलेल्या अशोक चव्हाण यांनीही एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आणि तितक्याच संयमाने कुरकुरत सांगितले की सरकारला अजिबात धोका नाही, पण सरकारमध्ये आमचेही ऐका असे अग्रलेखात म्हटले आहे. 

काँग्रेस नेते आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

महाविकास आघाडी सरकारच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जात नसल्यामुळे काँग्रेसचे मंत्री नाराज आहेत. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. काँग्रेसच्या मंत्र्यांना सरकारमध्ये दुय्यम स्थान मिळत असून, धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत काँग्रेसच्या मंत्र्यांना सहभाग दिला जात नाही, असा मंत्री अशोक चव्हाणांचा आरोप आहे. राज्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांचा एक वर्ग तीनही पक्षात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेस मंत्री अशोक चव्हाण यांनी एका वृत्तपत्र समुहाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना हे वक्तव्य केलं आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.