बीड । वार्ताहर
तालुक्यातील मैंदा येथील एका शेतकर्याच्या घरात शिरलेल्या चोरट्यांनी पेटीतील सोन्याचे दागिणे व रोकड असा तब्बल 69 हजारांचा ऐवज लंपास केला. शुक्रवारी (दि.12) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
भास्कर बाबासासाहेब घुमरे यांचे मैंदा येथे घर आहे. गुरुवारी रात्री कुटूंबीय घरात झोपलेले असताना मध्यरात्री ते पहाटे 3 वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी घरात प्रवेश केला. नंतर पाठीमागील खोलीत जावून पेटीतील 48 हजारांचे सोन्याचे दागिणे, 10 हजारांची रोकड, 11 हजार 250 रुपयांचे मंगळसुत्र व झुंबर असा ऐवज लंपास केला. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर घुमरे यांनी पिंपळनेर ठाण्यात तक्रार नोंदवली.अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
चिंचगव्हाणमध्येही घरफोडी
माजलगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथे शुक्रवारी सकाळी घरफोडीची घटना घडली. येथील सेवानिवृत्त कर्मचारी बन्सी चिमाजी डोंगरे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरातील चार पितळी घागरी, समई, एक मोठे भांडे, इस्त्री, 25 किलो मुगदाळ, 10 किलो चनादाळ, आहेराचे कपडे व लोखंडी बाज असे 16 हजार रुपये किमंतीचे संसारोपयोगी साहित्य चोरुन नेले. शहर ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल झाला.सहाय्यक निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.
Leave a comment