चक्रीवादळाच्या १० दिवसानंतरही कोकणात मदत पोहोचली नाही
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. फडणवीसांसोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार आशिष शेलारही उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांची भेट झाली.
निसर्ग चक्रीवादळानंतर देवेंद्र फडणवीस हे कोकणाच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यानंतर कोकणासाठी मदत करण्याच्या मागणीचं निवेदन घेऊन भाजपचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटले. दौऱ्यातलं सत्य मांडलं. वादळग्रस्तांना अजूनही मदत मिळाली नाही. लोकांना गुरांसारख राहावं लागतंय,मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोकण दौऱ्यात माझ्यासमोर जे सत्य आलं, ते मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलं, एक रुपयाचीही मदत तिथे अद्याप मिळालेली नाही. सरकारचं अस्तित्व कुठेच दिसत नाही, लोकांना शाळांमध्ये कोंबून ठेवलं आहे. हे तेथील विदारक चित्र मांडतानाच वादळग्रस्तांना रोख स्वरूपाता तात्काळ मदत मिळायला हवी अशी मागणी केल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
कोकणात पत्र्यांचा काळा बाजार सुरु आहे. कोळी बांधवांच्या बोटींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. लॉकडाऊन आणि वादळामुळे मच्छिमार बांधव आर्थिक गर्तेत सापडला आहे. त्याला एकतर तातडीने डिझेलचा परतावा म्हणून २५ हजार रुपये द्यायला हवेत आणि त्यांचं पूर्ण कर्ज माफ करायला हवं, अशी मागणीही आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे फडणवीस म्हणाले. जे छोटे स्टॉलधारक आहेत, त्यांना मदत करावी लागेल. पर्यटन व्यवसाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. या व्यवसायाला एमटीडीच्या माध्यमातून मदत केली पाहिजे. त्यांच्या कर्जावरील व्याज माफ करायला हवं, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली. ५० हजार हेक्टरी मदत ही मदत अत्यंत तोकडी आहे. बागायतीतील झाडं उन्मळून पडली आहेत. ही झाडं पुन्हा लावली तरी पुढची १० वर्षे उत्पादन देऊ शकणार नाहीत. त्यामुळे फळ पिकांची योजना लागू करून त्यांना मदत करणे आवश्यक, असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे फडणवीस म्हणाले. अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी या भेटीनंतर दिली. तसंच विजेच्या पोलसाठी पैसे मागितले जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.
चक्रीवादळाच्या १० दिवसानंतरही कोकणात मदत पोहोचली नाही. काही ठिकाणी तर दोन बिस्कीटचे पुडे आणि ३ मेणबत्त्या पोहोचल्या आहेत. आपण जाहीर केलेली १० हजार रुपयांची थेट मदत तत्काळ लोकांना उपलब्ध करून द्या, असं निवेदन भाजपने मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. चक्रीवादळाच्या ११ दिवसानंतरही शासन-प्रशासनाचे अस्तित्व जमिनीवर दिसून येत नाही, अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.
याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. पाहणीनंतर शरद पवार यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
मुख्यमंत्र्यांकडे फडणवीसांच्या या मागण्या
- वादळग्रस्तांना घरभाडं द्या
- मच्छीमारांना कर्जमाफी द्या
- फळबाग मालकांना अधिकची मदत द्या
- मच्छिमारांना डिझेल परतावा द्या
- छोट्या दुकानदारांना मदत द्या
- रेशनचे धान्य तात्काळ उपलब्ध करून द्या
- केरोसिन उपलब्ध करून देण्याची घोषणा, पण अजूनही मिळालं नाही. तेही तत्काळ द्या
- पेणच्या गणेशमूर्तीकारांना मदत द्या
- घरबांधणीसाठीचे दीड लाख रुपये कमी, ग्रामीण भागासाठी २.५० लाख आणि शहरी भागासाठी ३.५० लाख रुपयांचे अनुदान द्या
- बागायतदारांना ५० हजार हेक्टरी मदत अत्यंत कमी. बागांचं नुकसान झाल्यामुळे पुढचं १० वर्ष उत्पन्न बुडणार आहे. सरकारने गुंठ्याला ५०० रुपये मदत दिली आहे. बाग साफ करायलाच मोठा खर्च येणार आहे.
- १०० टक्के अनुदानातून फळबाग योजना लागू करा
- पर्यटन व्यवसायासाठी सरकारने कर्जाची हमी घेऊन यांना दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून द्यावं
- केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत मासेमारी आणि फळबाग यासाठी अनेक योजना घोषित केल्या आहेत. त्याचा लाभ प्राधान्यक्रमाने कोकणाला कसा मिळेल, यादृष्टीने तातडीने नियोजन करावे
- शाळा/समाजभवन/वाचनालये असे अनेक सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. त्यांनाही तातडीने मदत करण्यात यावी.
- जनावरांच्या चार्याचा मोठा प्रश्न तयार झाला आहे. सुका चार्याची उपलब्धता करून देण्यात यावी.
Leave a comment