बीड । वार्ताहर
गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात केलेल्या सेवेबद्दल सन्मान म्हणून बीड जिल्हा पोलीस दलातील 4 पोलीस उपनिरीक्षकांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दि.12 ऑगस्ट रोजी या पदकांची घोषणा केली आहे.
बीड जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेले उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे, आनंद जाधव,संजय कुकलारे व अप्पासाहेब रोकडे यांचा विशेष सेवा पदक जाहीर झालेल्या अधिकार्यात समावेश आहे. दरम्यान राज्यातील 1 हजार 148 अधिकारी-कर्मचार्यांना हे विशेष सेवा पदक जाहीर झाले असून सर्वांचे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्यांकडून अभिनंदन केले जात आहे. विशेष सेवा पदक लवकरच सर्वांना उपलब्ध करुन दिले जाणार असून यासाठी पदक प्रदान समारंभही आयोजित केला जाणार आहे.
राज्याच्या टोकावरील गडचिरोली व गोंदिया हे दोन्ही जिल्हे 16 जून 2021 पासून नक्षलग्रस्त म्हणून घोषित केलेले आहेत. या जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारकरित्या आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस अधिकारी, अंमलदारांनी विहित कालावधी पुर्ण केल्याने त्यांना विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.
Leave a comment