शब्दांमधून काशीचे दर्शन घडवण्याचे सामर्थ्य ‘काशीधाम’ पुस्तकात : डॉ. क्षीरसागर
काशीतील घाटांच्या माहितीचा पहिला मराठी संग्रह
बीड । वार्ताहर
काशी हे हिंदुंचे पवित्र तिर्थक्षेत्र आहे. काशीतील प्रत्येक घाट महत्वाचा असून त्याचा स्वत:चा इतिहास आहे. डॉ. अनिल बारकुल यांनी या घाटांची माहिती संग्रहित करुन ती पुस्तक रुपाने समोर आणली. केवळ शब्दांच्या माध्यमातून काशीचे दर्शन वाचकांना घडवण्याचे सामर्थ्य काशीधाम या पुस्तकात आहे. असे प्रतिपादन लेखिका प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांनी केले.
बीड येथील डॉ. अनिल बारकुल लिखीत काशीधाम या पुस्तकाचे मंगळवारी सायंकाळी बीडमध्ये डॉ. दीपा क्षीरसागर यांच्या हस्ते प्रकाशन झाले यावेळी त्या बोलत होत्या. आयएमए हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक गंमत भंडारी होते. तर, व्यासपीठावर ज्येष्ठ संपादक दिलीप खिस्ती, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनुराग पांगरीकर, डॉ. अनिल बारकुल, डॉ. सुनिता बारकुल यांची उपस्थिती होती. या वेळी बोलताना प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर म्हणाल्या, लेखनाच्या माध्यमातून त्या व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्ये कळत असतात. निसर्गाविषयी ओढ, ऐतिहासीक, पौराणिक बाबींत असलेली आवड, संशोधन वृत्ती, सुक्ष्म निरीक्षण क्षमता, काव्यात्मकता, उत्तम छायाचित्रकार या सगळ्या गुणांचा समुच्चय डॉ. बारकुल यांच्या लेखनात दिसून येतो.वैद्यकीय व्यावसायिक आणि विज्ञान शाखेचे विद्यार्थी असताना लिहलेले हे पुस्तक आश्वासक व विज्ञान, अध्यात्म यांची सांगड घालणारे आहे.
अध्यात्माची आवड असलेल्या पर्यटकाच्या नजरेतून उतरलेले हे पुस्तक आहे असे सांगताना डॉ. क्षीरसागर यांनी विविध कवितांचेही सादरकीरण केले. दिलीप खिस्ती यांनी डॉक्टरांनी लिहिते व्हावे असे सांगतानाच डॉ. बारकुल यांच्या लेखनाचा झालेला श्री गणेशा व लेखमाला चालवताना आलेले अनुभव सांगितले. डाॅ. अनुराग पांगरीकर यांनी काशीतील रचना पेशवेकालीन असून घाट जिर्णोद्धार कामात मराठी माणसांचे याेगदान आहे. घाटांच्या माहितीचे पहिले पुस्तक एका मराठी माणसाने लिहणे हे अभिमानास्पद असल्याचे सांगितले. अध्यक्षीय स्थानावरुन बोलताना ज्येष्ठ संपादक गंमत भंडारी यांनी डॉ. बारकुल यांनी वृत्तपत्रांमधून केलेल्या लेखनाचे अनुभव सांगितले. तर, सर्वच डॉक्टरांनी लिहिते होणे आवश्यक असून त्यांचा प्रत्येक शब्द हा आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा असल्याचे सांगितले. सूत्रसंचलन डॉ. सुधीर हिरवे यांनी केले. कार्यक्रमास शहरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
पुस्तक विक्रीचा निधी शांतिवनसाठी प्रास्ताविकात डॉ. अनिल बारकुल यांनी काशीतील घाटांचे महत्व, वेगळेपण, परकीय शक्तींनी आक्रमण करुनही ५ हजार वर्षांपासूनचा इतिहास कसा समृद्ध आहे याची माहिती दिली. पुस्तक विक्रीतून आलेला निधी हा वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या शांतिवन संस्थेला दान देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पुस्तक आईला समर्पित करत असल्याचे सांगताना ते भावूक झाले.
Leave a comment